Skip to main content

सॉरी


एकदा गौरी रडतच दादाजवळ आली. "दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे." तिचा रडवेला चेहरा बघून दादाने विषयाच गांभीर्य ओळखलं. "बाजूच्या रूम मध्ये जाऊन बसू. तिथे आपल्याला कोणी डिस्टर्ब करणार नाही", अस म्हणून दादा तिला बाजूच्या रूम मध्ये घेऊन गेला. दादाने तिला खुर्चीवर बसायला सांगितलं आणि तो समोरच्या बाकावर बसला. "बोल काय झाल?" गौरी मान खाली घालूनच बसली होती. दादाने विचारल्यावर तिच्या अश्रूंचा बांध फुटला. हुंदके देऊन ती रडायला लागली. दादाही तिला काही बोलला नाही. बऱ्याच वेळेला रडल्यानंतरच मन मोकळं होत. थोड्या वेळाने ती शांत झाली. दादाने तिला पाणी दिल. थोडी शांत झाल्यावर तिने सांगायला सुरवात केली.
"दादा, काल माझ्या हातून खूप मोठी चूक झाली रे. माझ आणि पप्पाचं काल घरात जोरात भांडण झाल. एवढं कि चाळीतीले लोक जमा झाले. ते मला प्रत्येक गोष्टीत अडवत असतात. हे करू नको ते करू नको. मी लहान पणापासून सगळं सहन केलं पण आता ते नाही होत. काल जरा जास्तच जोरात वाजलं. मी पप्पाना अरे तुरे केलं इथपर्यंत प्रकरण गरम झालं होत. त्यांनीही मला शिवीगाळ केला आणि मीही वाटेल तसं बोलली. पण मला आता कसंतरीच वाटतंय रे. ते घरी कुणाशी काही बोलत नाहीत आणि मीही नाही. मला कळतंय मी चुकीची वागलीय पण मी काय करू आता?" एवढं बोलून तिला पुन्हा रडू कोसळलं. 
दादा थोडावेळ शांत झाला. नंतर तिला समजवण्याच्या सुरात म्हणाला, "हे बघ. जे झालय ते मुळात चुकीचं आहे हे तुला पटतंय हि महत्वाची गोष्ट आहे. आज तू पप्पांशी भांडलीस, त्यांना वाटेल तस बोललीस याच्या मागच कारण तुझा राग असेल पण तस वागण्यामागे तुझ्या पप्पाची भावना काय असेल याचा विचार केलास का? ते तुला कोणतीही गोष्ट करण्यापासून परावृत्त करतात कारण त्यांना तुझी काळजी वाटत आणि ती जगातल्या कोणत्याही बापाला वाटण स्वाभाविकच आहे. ते जगातल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करतात. तू सुरक्षित रहाविस अशीच त्यांची अपेक्षा असते." 
गौरी ने मध्येच आडकाठी करत म्हटलं, "नाही रे दादा. त्यांचं नाही माझ्यावर प्रेम. ते फक्त माझ्या भावावर प्रेम करतात कारण तो मुलगा आहे आणि मी मुलगी आहे. माझ्या पप्पानी मला लहान पणापासून कधीच बोलून नाही दाखवलं कि त्यांचं प्रेम आहे माझ्यावर." 
दादाने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला आणि विचारलं, "तू बोलून दाखवलस त्यांना कधी?" तिने नकारार्थी मान हलवली. 
"प्रत्येक गोष्ट आपल्या पालकांनी आपल्यासाठी कराव्या अशीच आपली का इच्छा असते? आपण त्यांची मुलं म्हणून आपलं काही कर्तव्य नाही? काही माणसं नसतात तेवढी एक्सप्रेससीव्ह. त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता येत नाहीत. जास्त करून बाबा तसेच असतात. ते आतून भरभरून प्रेम करतील तुझ्यावर पण बोलून दाखवणार नाहीत अजिबात. तुला कोणती गोष्ट करताना अडवण्यामागे त्यांचा काय हेतू असेल? तुला त्रास देण?" तिने पुन्हा एकदा नकारार्थी मान हलवली. 
दादा पुढे सांगत होता, "जर त्यांचा हेतू तुला त्रास देण हा नसेल तर मग तुझी काळजी एवढाच असू शकतो. तू कोणत्या संकटात अडकू नयेस असच त्यांना वाटत असेल. त्यांचा प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे कि त्यांना ती गोष्ट तुझ्यासमोर व्यवस्थित मांडता येत नाही. आणि त्यामुळेच तूला त्यांची प्रत्येक गोष्ट अडथळा वाटत असेल आणि तू त्यांचं ऐकत नसल्याने ते अजून चिडत असतील." तिला कुठेतरी थोडं हलकं वाटायला लागलं होत. ती आता रडायची थांबली होती. 
"पण मी आता काय करू दादा? माझे पप्पा आता माझ्याशी कधीच बोलणार नाहीत". दादाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होत,"हा तुझा त्यांच्याबद्दलचा ग्रह आहे. या जगातला कोणताही बाप असा नाही जो स्वतःच्या मुलांशी कायम बोलणं टाकेल. हो पण फक्त सुरुवात तुला करावी लागेल. कारण ते मोठे असल्याने बऱ्याच वेळेला माफी मागण्यासाठी त्यांचा इगो आडवा येऊ शकतो. लहानपणी आपण चुकलो आणि आपली प्रत्येक चूक त्यांनी पदरात पाडून घेतली. आता जर ते कुठे चुकत असतील तर त्यांना आपण नको का समजून घ्यायला? पूर्ण आयुष्य त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी काढली आणि आता ते एवढीही अपेक्षा नाही करू शकत का मुलांकडून? तू आता फक्त एकच काम कर. मनापासून त्यांना सॉरी बोल. बाकी सगळं आपोआप होईल. सॉरी या शब्दामध्ये नात जपून ठेवण्याची ताकद आहे."
"पण एवढ्याने हा प्रॉब्लेम सुटेल अस मला नाही वाटत. माझे पप्पा खूप रागीट आहेत. त्यांच्या मनातून एकदा कुणी उतरलं कि ते कायमच." गौरी अजूनहि प्रश्नातच होती.
"तू बोलून तर बघ" दादा त्याच्या विधानावर ठाम होता. ती थँक यु बोलून निघून गेली.

गौरी आता पंधरावीला होती. तिने दादाच्या क्लास मध्ये ऍडमिशन घेतलं होत. क्लासमध्ये सगळी मूल शिक्षकांना दादा बोलत असत. गुरू आणि विद्यार्थ्यामध्ये सर या शब्दामुळे अंतर तयार होत असत आणि दादा म्हणजे मोठा भाऊ. दादा या शब्दानेच ते अंतर भरू शकत या विचारानेच हि संस्कृती क्लासमध्ये पूर्वीपासून रुजू होती. मूल बिनधास्त येऊन त्यांचे प्रॉब्लेम्स दादाकडे सांगत व दादाकडून त्यांना समाधान हि मिळे. गौरीनेही हक्कानेच तिची हि घटना दादाकडे मांडली होती.
दुसऱ्या दिवशी पुन्हा गौरी दादाला भेटायला आली. आज ती बऱ्यापैकी खुश दिसत होती. दादाने तिचा चेहरा बघूनच ओळखलं कि सबकुच ओके हो गया है. 
तिने आल्या आल्या दादाने विचारण्या अगोदरच सांगायला सुरुवात केली, "दादा काल इथून गेल्यावर मी सुरुवात कशी करू याचाच विचार करत होते. हे माझ्याकडून होईल कि नाही हे पण मला माहित नव्हत कारण मी कधीच आतापर्यंत कुणाला सॉरी बोलले नव्हते. संध्याकाळी जेव्हा पप्पा आले तेव्हा मी असून नसल्यासारखे ते वागत होते. त्यांचं माझ्याकडे लक्ष नव्हतं. मीही अजून सुरुवात कशी करावी या कोड्यातच होते. बराच वेळ गेला. जेवणाची वेळ झाली. जेवण झाल्यावर पप्पा लगेच झोपतात हे मला माहित होत आणि मला पुन्हा अजून एक दिवस वाढवायचा नव्हता. आता मी थोडी हिम्मत केली. पप्पा एका बाजूला त्यांचं काम करत उभे होते. मी त्यांच्यासमोर गुडघ्यावर बसले आणि त्यांचा हात हातात घेऊन त्यांना 'सॉरी, माझं चुकल' एवढंच बोलले कारण मला लगेच रडू आलं आणि पुढचं मला बोलायला जमलच नाही. दादा खरं सांगते, मी लहानपणापासून आतापर्यंत माझ्या पप्पाच्या डोळ्यात कधीच अश्रू पाहिले नव्हतं. काल ते पहिल्यांदाच सगळ्यांसमोर रडले. मी एवढी मोठी आहे आता तरीही त्यांनी लहान मुलीसारखं मांडीवर बसवून मला जेवण भरवलं. आणि झोपताना ते सुद्धा मला सॉरी बोलले. माझ्या पप्पांचा माझ्यावर एवढा जीव आहे हे मला पहिल्यांदाच समजलं. थँक यु दादा." तिला आता पुढे बोलता येत नव्हतं. तिच्या डोळ्यात पुन्हा पाणी उभ राहील. पण तीच आजच रडणं खूप वेगळं होत. आज तिच्या रडण्यात काहीतरी गवसल्याच समाधान होत.
-सुबोध अनंत मेस्त्री


#sahajsaral

Comments

  1. Feeling positive after red this.
    You are ever green bro...Subhodh Mestry

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...