श्रीमानयोगी वाचण्यापूर्वी मी कै. बाबासाहेब पुरंदरे यांची राजे शिवछत्रपती वाचली होती. मुळात सिरियल्स मधून किंवा सिनेमामधून महाराजांचा इतिहास लोकांसमोर मांडला जातोच. बऱ्याचशा गोष्टी ज्या ऐकल्या किंवा वाचल्या होत्या त्या वेगळ्या पद्धतीने श्रीमानयोगी मध्ये मांडल्या आहेत जसं कि महाराजांनी रायरेश्वरावर शपथ घेतली असं वाचलं होतं पण या कादंबरीमध्ये रोहिडेश्वरावर सांगितली आहे. किंवा अफझलखान स्वारीच्या वेळी सईबाईंचे निधन झाले तेव्हा महाराज त्यांच्यासोबत नव्हते हे वाचलं होतं पण यात महाराज सईबाईंसोबत आहेत हे मांडलं आहे. थोडं गोंधळून मी विनोद दादाला हा प्रश्न विचारला तेव्हा इतिहासकार आणि कादंबरीकार यात फरक असतो हे समजलं. कादंबरीकार गोष्ट लिहिताना बरीच लिबर्टी घेतात त्यामुळे ती गोष्टरूपाने वाचली गेली पाहिजे याचा उलगडा झाला. त्या दृष्टिकोनातून वाचल्यावर हे पुस्तक दमदारच आहे. एक कर्तव्यदक्ष पुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निभावत असलेली प्रत्येक भूमिका यात चोख मांडली आहे.
स्वराज्याचं तोरण उभारत असताना महाराजांना घरापासून बऱ्याच वेळा लांब राहावं लागलं. सईबाईंच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराज एकटे असताना त्यांना जिजाऊंचा आधार होता. पण जिजाऊंच्या निधनानंतर संभाजी महाराज आणि महाराज यांच्यातला दुवा संपला. ज्याकाळी स्वतःची माणसे दुरावली असताना संभाजी महाराजांना आधाराची गरज होती तेव्हा महाराज मोहिमेत व्यस्त असल्यामुळे ही दरी वाढत गेली आणि बाकीचा इतिहास बऱ्यापैकी सगळ्यांना माहित आहेच किंबहुना छावा चित्रपटामुळे तो लोकांसमोर आला आहे. ज्यांनी समाजासाठी योगदान दिलं त्या सगळ्या योध्यांना किंवा संताना आपल्या कुटुंबावर पाणीच सोडावं लागलं.
या पुस्तकातून सतत जाणवत राहते की स्वराज्य ही केवळ सत्ता मिळवण्याची महत्त्वाकांक्षा नव्हती, तर ती एक जबाबदारी होती. सामान्य माणसाच्या जीवनात सुरक्षितता, सन्मान आणि न्याय आणण्याचे स्वप्न महाराजांनी उराशी बाळगले होते. स्वतःच्या सुखापेक्षा समाजाचे दुःख मोठे मानणारा हा राजा आजच्या स्वार्थी जगात आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतो की आपण जे करतो, ते स्वतःसाठी की समाजासाठी? श्रीमानयोगी वाचताना नेतृत्वाची खरी व्याख्या समजते. सत्ता असूनही अहंकार नाही, विजय असूनही क्रौर्य नाही आणि शत्रू असूनही अधर्म नाही. स्त्रियांचा सन्मान, शत्रूच्या स्त्रियांकडे मातेसारखे पाहण्याची भावना, आणि धर्माच्या नावाखाली अन्याय न करण्याचा ठाम विचार समाजाला माणूस म्हणून जगण्याची शिकवण देतो. त्यात चुका सगळ्यांकडून होऊ शकतात हे सुद्धा बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने जाणवून दिलं आहे.
या कादंबरीतला प्रत्येक संघर्ष आपल्याला सांगतो की महानता सहज मिळत नाही. अपमान, संकटे, विश्वासघात, पराभव, त्याग हे सगळे झेलत महाराज उभे राहिले. हार मानण्याचा सोपा मार्ग असतानाही त्यांनी लढण्याचा कठीण मार्ग स्वीकारला. श्रीमानयोगी आपल्याला आत्मसन्मानाचे महत्त्वही शिकवते. गुलामी ही फक्त राजकीय नसते, ती मनाचीही असते. स्वतःच्या संस्कृतीचा, भाषेचा आणि अस्तित्वाचा अभिमान जागा झाला की समाज उभा राहतो. महाराजांनी तलवारीने लढा दिलाच, पण त्याहून अधिक लढा त्यांनी मनाच्या स्वातंत्र्यासाठी दिला आणि हाच लढा आजही प्रत्येकाने लढण्याची गरज आहे.
सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment