बरेच वर्ष उद्योगात असल्याने किंवा मुळात बिजनेस नेटवर्किंगचा भाग असल्याने बऱ्याच लोकांशी भेट होते. त्यात काही मोठमोठ्या उद्योजकांची सुद्धा भेट होते. त्यांच्याशी चर्चा होते. बऱ्याच नव्या गोष्टी कळतात किंवा शिकायला मिळतात. पण काही व्यक्ती आपल्या आयुष्याला, मनाला स्पर्श करून जातात. क्वचित असं घडतं की एखाद्या व्यक्तीचं इम्प्रेशन २ दिवस - ३ दिवस सलग डोक्यात राहतं. माझं तसं झालं. शुक्रवारी "उद्योग गर्जना २०२५" कार्यक्रमाच्या निमित्ताने वामन हरी पेठे ज्वेलर्सचे पार्टनर श्री. आशिष पेठे सर यांच्यासोबत वेळ घालवण्याची संधी मिळाली, त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली आणि हे मी माझं भाग्य समजतो.
यावर्षी महाराष्ट्र बिजनेस क्लब प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" या कार्यक्रमात लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अँड एक्सिलन्स चे डायरेक्टर श्री. अतुल राजोळी यांच्या रेफेरन्सने आशिष पेठे सरांचा कॉन्टॅक्ट मिळाला. अरुण सिंह सर, मंगेश यादव सर, दिनेश भरणे सर आणि मी असे चौघे त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. मुळात हजारो कोटींचा टर्नओव्हर असलेली व्यक्ती ज्यांना आपण कायम झी मराठी अवॉर्ड्स किंवा इतर कार्यक्रमात नेहमी पाहतो, त्यात पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा असल्यामुळे ते कितपत आपल्याशी बोलतील, किती वेळ देतील, इव्हेन्टला सुरुवातीपासून असतील का किंवा पूर्ण वेळ थांबतील का असे बरेच प्रश्न होते. पण त्यांच्या केबिनमध्ये गेल्यावर त्यांच्या स्वागतानेच अर्धेअधिक प्रश्न पुसून गेले. त्यांच्याशी एम. बी. सी. बद्दल चर्चा झाली. त्यांनी कार्यक्रम सुरु होण्याच्या आधी येण्याचे आश्वासन दिलं. आम्ही निघताना आवर्जून त्यांच्या मुलाला, मिहीरला बोलावून घेतलं आणि आम्हा सगळ्यांशी ओळख करून दिली. मिहिरजीना तुम्हीही या इव्हेंटला असं सांगितल्यावर "नक्कीच ट्राय करतो" असं ते म्हणाले. एवढा मोठा उद्योग सांभाळताना इतके नम्र कुणी कसं असू शकतं हा प्रश्न मला त्यादिवशी पडला होता.
इव्हेन्टच्या दिवशी ठरल्यावेळी ते पोहचले. सोबत मिहीरसुद्धा होतेच. मिहीरजीना मी "मिहीर सर" म्हटल्यावर "प्लिज सर नका म्हणू. मला खूप ऑकवर्ड फील होतं", असं मिहीर म्हणाले. मी हसत "ओक मिहीरजी" म्हटलं आणि कार्यक्रमाच्या गडबडीत असल्याने त्या दोघांना वेलकम करून माझ्या तयारीला लागलो. कार्यक्रम सुरु होण्याचा वेळ चारचा होता आणि त्याचवेळी त्यांना बोलवायला गेलो. "अरे वा! एकदम वेळेवर सुरु करता कार्यक्रम" अशी कॉम्प्लिमेंट त्यांनी दिली. माझ्या अंदाजाने ३ तासाचा कार्यक्रम आम्ही आखला होता जो जास्तीत जास्त साडेतीन तासावर जायला हवा होता. पण पूर्वीच्या काही ऍक्टिव्हिटीजमुळे कार्यक्रम जवळपास तासभर लेट झाला होता. सातेक वाजता मला आमच्या कोऑर्डिनेटर्सपैकी एक जण सांगायला आलं की बहुतेक पेठे सरांना लेट होतं आहे. मी त्या कोऑर्डिनेटरना सांगितलं कि अर्ध्या तासात आपण सरांचा इंटरव्यू चालू करू. तो तसं कळवायला निघून गेला पण पुन्हा काही मेसेज घेऊन आला नाही. १५-२० मिनिटांनी आशिष सरांचा मला मिसकॉल आला पण मोबाईल सायलेंट असल्याने कळालं नाही. मी जस्ट मोबाईल बाहेर काढून मिसकॉल पाहिला आणि मला समोर विंगेत आशिष सर दिसले. मी लगेच त्यांच्यासमोर गेलो. मला भीती होती कि ते आता निघण्याबद्दल म्हणतील.
मी जस्ट त्यांना विचारलं सर "सर, वॉशरूम ला जायचं आहे का?".
"नाही. चहा मिळेल का थोडा?" सरांनी विचारलं.
"होय" म्हणत मी त्यांच्या मागे व्ही. आय. पी. रूम कडे वळालो. तसे ते शांत वाटत होते.
व्ही. आय. पी. रूममध्ये आमच्या कोऑर्डिनेटर्स ने त्यांना चहा दिला व लाडू खायला दिले. मीच थोडा धीर करून सरांना म्हणालो "सर सॉरी, इव्हेन्ट थोडा लेट चालू आहे. पण मी तुमचा इंटरव्यू अलीकडे घेतो. पुढच्या ५-१० मिनिटात आपण चालू करू".
"नाही सुबोधजी, मला वेळेचा काही प्रॉब्लेम नाही. लोकांना भूक लागली असेल म्हणून मघाशी मी मेसेज पाठवला होता. कार्यक्रम लेट होत असेल तर माझा इंटरव्यू तुम्ही कॅन्सल केला तरी चालेल. मला तशी काही घाई नाही आणि माझ्यासाठी शेड्युल हलवू नका", सरांचं हे वाक्य ऐकून मी स्वतः भारावून तर गेलोच पण मनावरचा ताण प्रचंड हलका झाला.
"नाही सर, लोक तुम्हाला ऐकण्यासाठी इथे आलेत. आपण इंटरव्यू घेऊ. पुढच्या गोष्टी पटापट आवरण्याकडे मी लक्ष देतो. मिहीर नाही आले का? त्यांना बोलावू का इथे?"
"नाही. तो पाहतोय प्रोग्रॅम. मी फक्त थोडा वेळ बसण्यासाठी इथे आलो होतो.", मला काय बोलू काही सुचलं नाही. मी म्हटलं "सर तुम्ही बसा इथे. मी बोलावतो तुम्हाला" आणि मंचाकडे निघून गेलो. माझा ताण प्रचंड हलका झाला होता तरीही कार्यक्रम पटापट आवरून सरांच्या मुलाखतीकडे आम्ही वळलो. जेव्हा आम्हा दोघांना स्टेजवर बोलावलं गेलं तेव्हा मी सुरुवात करण्याआधीच त्यांनी माईक उचलला, " सुबोधजी, लोकांना भूक लागली असेल. आपण १० मिनिटात आवरतं घेऊ", असं म्हटले. मी त्यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली. आमचे जवळपास १५ प्रश्न ठरले होते त्यातले ५-६ प्रश्न त्यांना मी विचारू शकलो पण त्या १५-२० मिनिटांच्या इंटरॅक्शन मध्ये मी स्वतः खूप भारावून गेलो. एवढ्या सोप्या आणि प्रभावी भाषेत त्यांनी उत्तरं दिली की मीच काय प्रेक्षकसुद्धा मंत्रमुग्ध झाले.
"तुमच्यामते यशाची व्याख्या काय?", या प्रश्नावर "जेव्हा तुमची फॅमिली, तुमचे एम्प्लॉईज, तुमचे सप्लायर, तुमचे कस्टमर्स सगळेच तुमच्यावर खुश असतील तेव्हा समजा कि तुम्ही सक्सेसफुल आहात." हे उत्तर आलं.
"जास्त करून १-२ पिढीच्यावर व्यवसाय जात नाही. तुमची आता पाचवी पिढी व्यवसायात आहे. हे कसं शक्य झालं?" या प्रश्नावर "आम्ही कायम आमच्या पुढच्या पिढीला आमच्या सोबत घेऊन चालतो. ते ऑब्जर्वर म्हणून काम करतात. आज सुद्धा मिहीर माझ्यासोबत आहे. सगळ्यांशीच नम्रतेने कसं वागायचं हे आम्हाला शिकवलं गेलं आणि आम्हीही तेच पुढच्या पिढीला सांगतो.", या उत्तरावर मी समोर पाहिलं तर मिहीर दुसऱ्या रो- मध्ये बसून आमच्या मुलाखतीचं शूट करत होते. आकाशाला गवसणी घालताना जेव्हा तुमचे पाय जमिनीवर असतात तेव्हा तुम्ही आजूबाजूच्या व्यक्तींच्या मनाला कायम स्पर्श करता. मला मिहिरजीचं प्रचंड कौतुक वाटलं. पुढच्या काही प्रश्नांवर अशीच अप्रतिम उत्तरं घेऊन आणि जवळपास प्रत्येक उत्तरावर लोकांच्या टाळ्या घेऊन मुलाखत संपली. हा संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रपतिपदक विजेते ॲडिशनल एस. पी. म्हणजेच आमचे संजय गोविलकर दादा समोरून पाहत होते. मुलाखत संपताच त्यांनी अरुण सरांना "मिहिरजीना सुद्धा स्टेज वर बोलवा" असे सांगितले. मी धन्यवाद बोलण्यासाठी मंचावर उभा राहिलो आणि मला अरुण सरांनी मला ते माझ्या कानात येऊन सांगितले. "मघापासून आपण ज्यांचं नाव ऐकतोय, वामन हरी पेठे ज्वेलर्सची पुढची पिढी, मिहिरजी यांना मी मंचावर आमंत्रित करतो", असं म्हणून जेव्हा मिहिरजी स्टेजवर आले त्यांना महाराष्ट्र बिजनेस क्लब कडून त्यांना एक मोमेंटो देण्यात आला. तेव्हा माझ्या कानात येऊन "याची काही गरज नव्हती खरं तर" असं मिहीरजीनी नम्रपणे सांगितलं. मी फक्त स्माईल दिली, पण तुमच्यासारख्या दोन मान्यवरांचा सहवास आम्हाला लाभला हे आमचं भाग्यच असं मी मनातल्या मनात म्हटलं. रात्री घरी येताना गाडीमध्ये प्रतिभा मला सांगत होती, "अरे तुझी खुर्ची खूप क्रॉस होती, आणि तू सरांकडेच बघत होतास. सर प्रॉपर समोरच्या फेसिंगला बसले होते. तू पण करायची ना खुर्ची समोर. मी तुला खुणावायचा प्रयत्न केला पण तू समोर पाहिलंच नाहीस". मी तिला काही उत्तर दिलं नाही. कारण ती मुलाखत घेताना मी माझ्यात नव्हतोच.
तीन सव्वा-तीन तासांचा कार्यक्रम ठरलेला असताना तो साडेचार तास चालला. त्यात पूर्णवेळ थांबून आयोजकांवर कोणताही दबाव न आणता सतत चेहऱ्यावर स्मितहास्य ठेवत "तुम्ही जे करताय ते फार उत्तम कार्य आहे" अशी शाबासकीची थाप देऊन आशिष सर आणि मिहीरजी माझं मन जिंकून निघून गेले. खरं सांगतो, माणूसरुपी देवाचं दर्शन त्यादिवशी घडलं.
- सुबोध अनंत मेस्त्री
Comments
Post a Comment