Skip to main content

पप्पांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त

 




महाभारतात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. तेव्हा अर्जुन म्हणाला,
"देवा, या विश्वात इतकं वाईट चाललंय. इतकी वाईट माणसे आहेत. तर मग हे जग कसं काय शाबूत आहे."
त्यावर कृष्ण म्हणाला, "या जगात जशी वाईट माणसे आहेत तशी काही चांगली माणसे सुद्धा आहेत ज्यांच्या मुळे हे संपूर्ण विश्व चांगलं चाललय, शाबूत आहे." आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजचे उत्सवमूर्ती हे या चांगल्या माणसांपैकीच एक!
 
बाप म्हटल की कायम कुटुंबासोबत असणारा आधाराचा हात दिसतो.  ज्यांनी दिवस रात्र काम करावं, गरज पडली तर कुटुंबापासून दूर राहावं, अतोनात मेहनत करून स्वतःची स्वप्न बाजूला सारून फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात हे आमच्या  आधीच्या जवळपास सगळ्या पिढ्यांच समीकरण.  हल्लीची पिढी बाबाशी मैत्रीपूर्ण वागते, बाबाला अरे तुरे करते, प्रसंगी हक्काने भांडते, उलट बोलते.  आमच्या पिढीने बाबांना नेहमी आदरयुक्त भीतीने पाहिले आहे.  त्यांच्या नजरेत, आवाजात कायम जरब पाहिली आहे.  प्रसंगी प्रेम आणि वेळोवेळी धाक पाहिला आहे.  ही पिढी कदाचित मैत्रीपूर्ण नव्हती पण त्यांचे संस्कार आणि विचारधारा वर्षानुवर्ष दरवळत राहतील.  या पिढीपैकीच एक आमचे पप्पा!

पप्पांचा जन्म १९५३ सालचा.  दिवस नेमका माहीत नाही.  पण शाळेत प्रवेश घेण्याच्या निमित्ताने दाखल्यावर १ जून तारीख लिहिली गेली आणि जागतिक जन्म दिवसांमध्ये आमच्या पप्पांच्या देखील  समावेश झाला.  घरात मोठी आमची अक्का पण मुलांमध्ये मोठे पप्पा.  जवळपास ८ भावंडं, आई बाबा, आजी असं मोठं कुटुंब.  आजोबा सुतार असल्याने हातावर पोट.  चिकन मटण सणावाराला वर्षातून एकदाच बनायचं.  घरात भाकरी नसल्याने प्रसंगी रानात जी भाजी मिळेल फक्त तिच खाऊन या कुटुंबाने पोट भरलं.  घालायला व्यवस्थित कपडे नाहीत.  एवढ्या कुटुंबाला एकट्याने सावरायचं म्हणजे प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करणे शक्यच नव्हतं. 

अशा बिकट परिस्थितीमध्ये देखील आमचे पप्पा जुनी मॅट्रिक म्हणजेच ११ वी पास झाले.  घरातली बेताची परिस्थिती पाहता पुढचं शिक्षण पूर्ण करणं शक्यच नव्हतं आणि आता घराच्या जबाबदारीत हातभार लावणं अत्यंत गरजेचं होतं.  प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सामान्य आयुष्य जगायचं नाही.  काहीतरी वेगळं करायचं हे संस्कार कदाचित त्यांच्याकडून आमच्याकडे आले आहेत. त्यांनाही गावात एका जागी राहायचं नव्हतं.  कुटुंबात मोठे असल्याने त्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती.  त्यांनी मुंबई गाठायच ठरवलं. 

वयाच्या १७ व्या वर्षी  मुंबईत ठाण्याला त्यांच्या आत्येच्या घरी ते राहायला आले.  तिथे मामांच्या म्हणजेच आत्येच्या नवऱ्याच्या शिफारसीने १९७१ मध्ये त्यांना एस. टी. मध्ये कॉन्ट्रॅक्ट वर नोकरी लागली.  तेव्हा त्यांचा पगार ४५० रुपये होता. अपघात होऊन आलेल्या एस. टी. रिपेअर करणे हे काम त्यांच्याकडे होतं.  त्यांचे मामासुद्धा तेच काम करायचे.  पण जे काम करण्यासाठी मामा एक - दोन महिने लावायचे तेच काम पप्पा ७-८ दिवसात करायचे त्यामुळे मामांना थोडी इन्सेक्युरीटी वाटायला लागली.  

काही काळाने एस. टी. च्या कामात पप्पांना ब्रेक मिळाला आणि त्यांना घरी बसावं लागलं.  त्यावेळी आत्येच्या घरात भांडी घासण्यापासून सगळी कामे त्यांनी तक्रार न करता केली.  त्यांचे नातेवाईक एकदा गावावरून ठाण्याला आले तेव्हा त्यांनी पप्पांची अवस्था पाहिली आणि त्यांना गावाला परत घेऊन गेले. याचदरम्यान पप्पांना एस. टी. मधून कायम स्वरूपाच्या नोकरीच लेटर आत्येच्या घरी आलं पण ते मामांनी फाडून टाकल.  हे काही महिन्यानंतर एस. टी. मधल्या मित्राकडून पप्पांना समजल पण तोपर्यंत तिथली जागा भरली होती.  चांगल्या पगाराची कायम स्वरुपी नोकरी पप्पांपासून हिरावली गेली.

"ठेविले अनंत तैसेचि राहावे"...या उक्तीनुसार जर आमचे अनंत एकाच जागी राहिले असते तर कदाचित आजचा दिवस बघण्याचे भाग्य आमच्यापैकी सगळ्यांच्याच नशिबात नसतं.  "अनंत आमुची धेयासक्ती...अनंत आमुची आशा" या ओळींप्रमाणे पुन्हा येणाऱ्या आव्हानांना भिडायला ते तयार होते.  त्यांना गावाला स्वस्थ बसता येत नव्हतं.  त्यांनी पुन्हा एकदा मुंबईमध्ये येऊन आपलं नशीब आजमवण्याचा प्रयत्न केला.  सुतारकाम कॉन्ट्रॅक्टवर घ्यायला त्यांनी सुरुवात केली.  

तेव्हा राहायला म्हणून गोवंडीत फक्त पत्र्याची शेड होती.  जमीन म्हणजे फक्त माती होती.  त्यांचे भाऊ, आमच्या मुर्तवड्याच्या आत्येचे मिस्टर म्हणजेच आमचे मामा असे काहीजण तिथे राहायला होते.  दिवसभर सामान त्यांना वर उंचीवर ठेवावं लागायचं.  कामावरून आल्यावर रोज संध्याकाळी ती जमीन चोपून तिथे मग जेवणापासून बाकीची कामं करावी लागायची.  "दिवसभर तिथे कुत्री राहायची आणि रात्री आम्ही राहायचो" असं एकदा मामांनी आम्हाला गमतीत सांगितलं होतं.  "तुमच्या पप्पानी हिम्मत दाखवली म्हणून ते पुढे गेले" हे सुद्धा मामांनीच सांगितलं.  कधी पैसे नाही आणि पीठ संपलं म्हणून पिठाच्या डब्ब्यात पाणी ओतून ते पिऊन कित्येकदा पप्पा उपाशीपोटी झोपले.

पुढे व्यवसाय वाढत गेला आणि मग आमची आई लग्न होऊन घरात आली.  तेव्हा पप्पांनी घाटल्यात पत्र्याचा रूम घेतला होता.  आईचा व्यवहारिकपणा आणि पप्पांची मेहनत यामुळे घराला घरपण यायला सुरुवात झाली.  दुसऱ्या मुलाच्या म्हणजे प्रमोदच्या वेळी आईला काही वर्ष गावी राहावं लागलं.  त्या बाळंतपणात तिची तब्येत खालावली.  पुढे तिला आजारांनी घेरायला सुरुवात केली.   सुबोधच्या जन्माच्या वेळी तर आई पप्पा दोघांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागला.  भर पावसात दिवसभर काम करून घरी यायचं, त्यात घरी सगळ्यांसाठी जेवण करून पुन्हा चेंबूर ते परेल के. ई. एम. पर्यंत प्रवास करून आईला डब्बा घेऊन जायचा.  हे पप्पाना कितीतरी दिवस करावं लागलं.  त्यानंतर आईची २-३ मोठी ऑपरेशन्स झाल्यावर पुन्हा दिवसभर स्वतःच काम करून, आम्हा लहान मुलांना सांभाळून, घरातली कामं करून आईला सांभाळणं हे दिव्य त्यांना पार करावं लागलं.  पण इतकं असूनही त्यांनी कधी कंटाळा केलाय किंवा जबाबदारी झटकली असं आम्ही पाहिलं नाही.   पुढे देखील कित्येक वेळा कामावरून घरी येऊन त्यांना आईला मदत करतानाच आम्ही पाहिलं.  आजही या वयात सूनाना मदत करताना त्यांचा उत्साह तोच आहे आणि हाताला चवही तशीच आहे.

आम्ही सगळीच मुले त्यांच्या धाकात वाढलो. खूप लहान असताना कदाचित त्यांनी आमचे लाड केले असतील पण जसे मोठे होत गेलो तशी त्यांची आदरयुक्त भीतीच जास्त वाटत राहिली.  त्यांनी आमच्यावर हात उचलावा असे प्रसंग खूप कमी आले पण जे आले ते मनावर कायम कोरले गेले.  त्यामुळे त्यांची आदरयुक्त भीती आणि नजरेतला धाक अजूनही तसाच आहे.  

जे हट्ट केले ते सगळे आईकडे.  पप्पांशी कोणती गोष्ट बोलण्याची कधी हिम्मतच झाली नाही.  त्यांनी कधी उघड उघड आपल प्रेम आमच्याकडे व्यक्त केलच नाही. त्यामुळे आम्हाला खूप वाईटसुद्धा वाटायचं.  पण पप्पा आम्हाला कळाले ते आम्ही मोठे झाल्यावर.  स्वतः त्यांच्या भूमिकेत आल्यावर अजूनही जास्त.  

"सगळे म्हणतात ना तू काय कमवलं? माझी मुलंचं माझी प्रॉपर्टी आहेत. त्यांच्यासाठी मी काहीही करेन." हे त्यांचं वाक्य मनावर कायम कोरल गेलं.  तेव्हा त्यांच्या व्यक्त न होण्यामागच्या भावना उलगडत गेल्या.  

व्यवसाय करताना कित्येक ठिकाणी त्यांचे पैसे बुडाले, भारतभर दौऱ्यामुळे कुटुंबापासून लांब राहावं लागलं, प्रचंड संघर्ष त्यांना करावा लागला पण त्यांना दुःखी किंवा रडताना आम्ही पाहिलं नाही.  ते रडले फक्त त्यांचे बाबा, त्यांची आई आणि आमची आई गेल्यावर.  खरच बापाला उघडपणे रडता पण येत नाही.  आई बाप गेल्यावर कुटुंबाला सांभाळायचं असतं आणि बायको गेल्यावर मुलांना.  

"जर आपण कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं कधीच वाईट होणार नाही", ही त्यांची शिकवण आमच्या मनावर लहानपणापासून कोरली गेली.  आपल्या संपूर्ण कुटुंबाला एका वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल तर कुटुंबातल्या एका व्यक्तीला स्वतःच्या आयुष्याचं समर्पण करावं लागत.  पप्पांनी ते समर्पण केलं.  त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्याला एक दिशा मिळाली.  संपूर्ण कुटुंबाच्या उत्कर्षाचा भक्कम पाया त्यांनी रचला यासाठी येणाऱ्या कित्येक पिढ्या त्यांच्या ऋणी राहतील.   

"अनंत"...ज्यांच्या विचारांना, प्रेमाला, आपुलकीला, कार्यशक्तीला, कणखरपणाला अंत नाही असे आमचे पप्पा.  वयाची सत्तरावी आली तरीही त्यांचा काम करण्याचा, टापटीपपणाचा उत्साह आजही सगळ्यांना लाजवेल असाच आहे.  कोणतीही जबाबदारी घेताना ते मागे पुढे बघत नाहीत.  आईच्या आजारपणापासून, स्वतःच्या मुलाचा मोठा अपघात आणि त्यानंतर अजूनपर्यंत त्याला रात्री अपरात्री भयंकर फिट येताना बघण्याचे कित्येक कठीण प्रसंग त्यांनी सहन केले आहेत.  

स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत आजही तितक्याच तन्मयतेने ते पूर्ण कुटुंबाची काळजी घेतात.  घरात सगळ्यांना मदत म्हणून सगळी कामं करतात. आमच्यासोबत आपल्या भावांचा - बहिणींचाही तितकाच विचार करतात. कोणत्याही नातेवाईकांचा आनंदाचा किंवा दुःखाचा कोणताही प्रसंग चुकवीत नाहीत. आम्ही नेहमीच म्हणतो की त्यांच्या १०% जरी आपल्याला होता आलं तर आपलं भाग्यच!  अनंताच्या फुलाप्रमाणे त्यांचा सुवास कायम आमच्या हृदयात दरवळत राहील.

पप्पा, आज तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्याशिवाय आमच्या अस्तित्वाला अर्थ नाही. तुमच्यावरच प्रेम आम्ही प्रत्येक वेळी काही ना काही निमित्ताने व्यक्त करत आलोच आहोत आणि ते वर्षानुवर्षे वाढतच गेलं आहे.  
आमच्या आयुष्यात तुमची जागा काय आहे आणि तुमची आम्हाला किती गरज आहे हे शब्दात मांडणं कठीण आहे.

यापुढे देखील तुम्हाला आनंदाचे आणि अभिमानाचे अनेक प्रसंग देवू यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध आहोत.  

तुमच्या कर्तृत्वाचा आम्हाला अभिमान नाही तर माज आहे.  तुमचे उपकार फेडायला पुढचे ७ जन्म कमी पडतील आणि मुळात या उपकाराच्या सुःखद ओझ्याखाली रहायलाच आम्हाला आवडेल. तुमची शंभरावी सुध्दा याच अंगणात या पेक्षाही अधिक जल्लोषात साजरी करायची आहे.  म्हातारपण हे दुसर बालपण असतं असं म्हणतात.  हि सत्तरावी नाही तर सतरावे वर्ष चालू झाले आहे अस समजा.  तुम्ही तुमचं हरवलेलं बालपण पुन्हा नव्या जोमाने जगा.  तुमच्या सगळ्या ईच्छा पुरवण्यासाठी आम्ही सगळे आहोतच. 

आम्हा सगळ्यांचं तुमच्यावर प्रचंड प्रेम आहे.  आज आई आपल्यात नाही.  पण ती नक्कीच तुमच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करीत असेल आणि तुमच्याकडे कौतुकाने बघत असेल.   

आई भवानी आपल्याला उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य देवो!

तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पप्पा!

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...