"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!"
"If you are not paying for the product, then you are the product."
नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या. याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे हायलाईट झालं.
"मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो. यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील". काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही. हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे.
"त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे". ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डेटा ॲनालिसिस व कॅम्पेनिंग करणाऱ्या कंपनीने डोनाल्ड ट्रम्पसाठी काम केलं होत. फेसबुक थर्ड पार्टी ॲप्सना ॲक्सेस देतं याचा फायदा घेऊन या कंपनीने एक ॲप डेव्हलप केलं ज्यात युजरच्या पर्सनालिटी टेस्टचा सर्वे घेतला जायचा. यासाठी युजरला ५ डॉलर्सपर्यंत पैसे सुद्धा मिळायचे. यामध्ये फक्त एक अट होती की युजर्सना "Login with Facebook" करावं लागायचं. यामध्ये युजरच्या प्रोफाईलचा ॲक्सेस केंब्रिज ॲनालिटीकाला मिळत होता. यापद्धतीने त्यांना जवळपास २ लाख ७० हजार लोकांच्या फेसबुक प्रोफाईलचा डेटा मिळाला. त्यासोबतच या लोकांच्या फ्रेंड्सच्या प्रोफाईलचा ॲक्सेस मिळून तो आकडा जवळपास ८ करोड ७० लाख अमेरिकन नागरिकांपर्यंत पोहचला. एका व्यक्तीचे किमान ५००० डेटापॉइंट्स त्यांना मिळाले आणि डेटा ॲनालिसिसच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येक व्यक्तीची प्रोफाईल स्टडी केली. त्यातून प्रत्येक व्यक्तीची पर्सनालिटी कशी असेल याचा अंदाज बांधला गेला. हे सगळं आर्टिफिशियल इंटेलिजंसच्या माध्यमातून आपोआप होत गेलं. व्यक्ती स्वतःला किती ओळखतो यापेक्षा ती सिस्टम त्या व्यक्तीला जास्त ओळखायला लागली. ट्रम्पच्या प्रतिस्पर्ध्यांबद्दल काही नकारात्मक कंटेंट तयार करण्यात आले व अमेरिकन नागरिकांना त्यांच्या मुडनुसार ते कंटेंट दाखवण्यात आले. यातसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजंस अत्यंत हुशारीने काम करतो. यानंतर एका अमेरिकन पत्रकार कॅरोल कॅडवालडर हिने या गोष्टीवर फोकस आणला आणि अभ्यासात केंब्रिज ॲनालिटीकामध्ये डेटा सायंटिस्ट म्हणून काम करण्याऱ्या क्रिस्तोफर वायली याच्याशी संपर्क साधला. यामुळेच पुढे सगळ्या गोष्टी उघडकीस आल्या. शेवटी हे प्रकरण बराच वेळ चाललं आणि "यापुढच्या निवडणुका प्रामाणिक पद्धतीने होऊ शकतात का ?" असा प्रश्न उपस्थित झाला. जेव्हा विधान शाखेमध्ये (अमेरिकेत ज्याला काँग्रेस म्हणतात) मार्क झुकेरबर्ग (फेसबुकचा जनक) याला याबाबतीत प्रश्न विचारले गेले तेव्हा त्याला बऱ्याच गोष्टींची उत्तर देता आली नाहीत.
२०१४ च्या इलेक्शनबाबत स्वाती चतुर्वेदी यांचं "आय ॲम अ ट्रोल" हे पुस्तक सुद्धा काही अंशी या गोष्टीवर प्रकाश टाकतं. सध्या आपण वापरत असलेले सोशल मीडिया ॲप (इतरही फ्री ॲप असू शकतात) तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक करत आहेत. मुळात तुम्ही जे बोलता (कोणत्याही भाषेत) तेसुध्दा हल्ली ट्रॅक होते आहे आणि याची बरीच उदाहरणे आहेत. यात तुमचा डेटा सरळ कोणत्या कंपनीला विकला जात नसेल तरी तुमच्या वैयक्तिक व्यक्तिमत्वाचा पूर्ण अभ्यास या ॲपचा आहे. तुमच्या प्रत्येक वैयक्तिक व व्यावसायिक आयुष्याबद्दलची तंतोतंत माहिती या कंपन्यांकडे आहे. आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला इन्फॉर्मेशन दाखवली जातेय. जर हे थांबवायचं असेल तर साधा की पॅड वाला फोन वापरावा लागेल जे सध्याच्या घडीला बऱ्याच जणांसाठी कठीण आहे. त्यामुळे जे तुम्हाला दिसतंय किंवा दाखवलं जातय ती प्रत्येक गोष्ट खरी असेल असं खात्रीलायक मानू नका. कारण आपल्याला तेच खरं वाटतंय जे आपल्याला दाखवलं जातंय.
तूर्तास एवढंच!
धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
Thanks for info....yes we are in a trap... नक्कीच दोन्ही डॉक्युमेंट्री बघते.
ReplyDelete