Skip to main content

पत्त्यांचं घर



"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला.

"हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला.

मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली.

"अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं.

"आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला.

"सात माळ्याचं", मी टारगेट दिलं.

"पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये आश्चर्याने ओरडत प्रत्येक शब्दावर जोर देत कमरेवर हात ठेवून बोलत होता.

"का नाही? चार माळ्याचं बनवू शकतो मग तू सात माळ्याचं का नाही बनवू शकत?", माझे नेहमीचे मोटिव्हेशनचे डोस.

"तसं नाही पप्पा. मी बनवू शकतो.  पण एवढे पत्ते पुरणार आहेत का?", त्याची अगोदरची रिऍक्शन टारगेट वर नव्हती आणि कॅल्क्युलेशन पण बरोबर होतं.  "मला बाबांचे पत्ते घ्यावे लागतील अजून", त्याने मला आयडिया दिली.  अगोदर हा जुना पत्त्यांचा कॅट घर  बनवायला वापरत होता.  बाबांकडून मागायचे म्हणजे दिव्य.  पण त्याने विचारल्यावर बाबांनीही आढेवेढे घेतले नाहीत.

दुसऱ्या दिवशीच सकाळी अकरा वाजता तो घर बनवायला बसला.  गरम होत असताना बेडरूममध्ये फॅन न लावता तो बसला होता.  मध्येच असह्य झालं की बाहेर हॉलमध्ये यायचा आणि फॅन खाली थोडा वेळ बसून पुन्हा आत जायचा.  कित्येक वेळा बेडरूम मधून "शीट शीट शीट....ओह नो", असे त्याचे मोठमोठ्याने आवाज यायचे.  त्यावेळी घर कोसळतंय हे काही वेगळं सांगायला नको होतं. एकदा त्याने पाचव्या माळ्यापर्यंत घर बांधलं आणि मला बेडरूममध्ये बोलावलं.  हे घरसुद्धा त्याने भिंतीचा सपोर्ट न घेताच उभं केलेलं.  सहावा आणि सातवा माळा बांधताना मी तिथेच थांबावं अशी त्याची ईच्छा होती.  मी त्याचे फोटो काढले.  व्हिडीओ रेकॉर्डिंग ऑन केलं.

"पप्पा शेवटी पत्ते लावताना भीती वाटते", त्याने निरागसपणे सांगितलं.

"घाबरतोस म्हणून पडतं.  घाबरायचं नाही.  बिनधास्त लाव", मी त्याला धीर दिला.

"आणि पडलं तरी परत लावायचं", त्याने उत्तर दिलं.  सातवा माळा बांधताना पुन्हा डोलारा कोसळला.  तो अपसेट व्हायचा पण तेवढयापुरताच.   पुन्हा सुरु करायचा.   असं तीन चार वेळा झालं.   आणि शेवटी त्याने सात माळ्याच घर बांधलंच.  मला दाखवताना पुन्हा एकदा तो खुश झाला.  "आता किती?", त्याचा लगेच प्रश्न.

"दहा", त्याने माझं चॅलेंज स्वीकारलं.  त्या दिवशी तो रात्री साडे दहा पर्यंत तेच करत होता.  पण दहा माळ्याच घर काही बनलं नाही.  त्यानंतर तो बरेच दिवस प्रयत्न करत होता पण त्याचं घर काही बनत नव्हतं.  एकदा नऊवा माळा बांधताना सगळं घर कोसळलं.

"पप्पा मला वाटतंय दहा माळ्याच घर बनणार नाही", त्याने एका संध्याकाळी मला सांगितलं.

"पत्ते कमी पडतायत?", त्याने हार मानली नसावी या अंदाजात विचारलं.

"हो.  नवीन पत्ते आणावेच लागतील.", त्याचे नेहमीचे हातवारे आणि ऍकटींग.  मी त्याला पैसे देऊन दोन नवे कॅट आणायला सांगितले.  नवे पत्ते घर उभारताना टाईल्सवर सरकायला लागले.  पण त्याचा प्रॉब्लेम मी त्याच्यावर सोडला होता.   मध्येमध्ये त्याने प्रयत्न सोडला असं वाटलं की मी सहज विचारायचो.  "होईल ओ पप्पा", हे त्याचं उत्तर.

परवा संध्याकाळी ऑफिसमध्ये आमच्या व्हिडीओ चॅनेलच शूटिंग चालू असताना प्रतिभाचा मेसेज आमच्या फॅमिली व्हाट्सअँप ग्रुपवर आलेला पाहिला. त्यात काही फोटोज आणि व्हिडीओ होता.  त्याने दहा माळ्याच घर बांधलं होतं आणि मागे पोज देऊन उभा होता.  यावेळी मी स्वतः खूप खुश झालो.  सगळ्यांना आवर्जून कौतुकाने फोटो दाखवले.  व्हिडीओमध्ये तो आनंदाने नाचत होता.  यावेळी हॉलमध्ये घर बांधत असल्याने त्याने हॉलचे सगळे पंखे बंद केले होते.  आई बाबा हॉलमध्ये टीव्ही बघत असल्याने त्यांना गरमीतच बसावं लागलं होतं.   व्हिडीओ मध्ये एक वाक्य जो तो आनंदात बोलला आणि ते  माझ्या मनाला भावलं, "सगळ्यांना थँक यू बोलतो एवढ्या गरमीत राहण्यासाठी".  यश मिळाल्यानंतर समोरच्या व्यक्तींनी केलेला त्याग कळावा एवढा तो अजून मोठा नाही पण कधीकधी ही मुलं असं काही वागून जातात की जशी ती आपल्यालाच काहीतरी शिकवत आहेत.


आता सार्थक पंधरा माळ्याचं घर बांधायचं म्हणतोय 😊

(वरच्या व्हिडीओ मध्ये टिपलेले काही क्षण आहेत)

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. खरंच खूप हुशार आणि जिद्दी आहे आपलं पिल्लू. एखादी गोष्ट हातात घेतल्यावर ती पूर्ण झाल्याशिवाय तो हलत नाही. 4 माळे, 7 माळे, 10 माळे असे एक एक टप्पे त्याने पूर्ण केले ते पूर्ण करत असतानाच तू ते व्हिडीओ मार्फत अचूक टिपलं आहेस.
    10 माळे करताना त्याच्याकडून होतच न्हवता तो खूप त्रागा करत होता त्याला शांत व्हयला सांगितलं, हळू आणि शांतपणे कर तेव्हा हळू हळू करायला घेतलं, जेवायची वेळ झाली त्याला बोलले आधी जेव तर नाही माझं होत आलाय थांब मम्मी फक्त 5 मिनीट हा असं बोलत असताना 9 माळा तयार झाला मग मी एक फोटो काढला मग लगेच त्याने 10 व माळा पूर्ण केला आणि नाचू लागला. आम्ही सगळे खुष झालो. आई पप्पा पण खूपच खुश झाले त्याचे मग पोज वाले फोटो काढले मग लक्षात आलं की विडिओ काढुया तेव्हा लगेच ते सुंदर क्षण मी कैद केले. त्यात तो आनंद व्यक्त करता करता त्याने आभार पण व्यक्त करून गेला त्याच खूपच कौतुक वाटलं . आई बोलतात एवढासा पोर तो तरी त्याला कळतंय बघ कसं. सगळयांनी त्याची पा घेतली मग तो विचारू लागला 15 मळ्याच पण घर बांधता येईल ना.
    त्याने आनंदात जे आभार मानले त्याच मला खूपच कौतुक आहे कारण आपण मोठे ह्या गोष्टी विसरतो केव्हा केव्हा बोलायला संकोच करतो पण त्याने ते निरागसपणे बोललं त्यातच सर्व आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये motivational गुरू तू त्याचा आहेसच.

    ReplyDelete
  2. So innocent, but emotional too. Keep The Spirit!!!

    ReplyDelete
  3. Great सार्थक मस्त । तू नक्कीच पंधरा माळ्याचं घर बांधशील.😘

    ReplyDelete
  4. वा!! खुपचं सुंदर. सुट्टीचे indoor खेळ शोधताना हा ब्लॉग वाचला. सार्थक तर कोतुकास्पद आहेच , पालक म्हणून तुमचं inspiration great !! आणि मुख्य म्हणजे मला माझ्या YouTube channel साठी हा माझा आवडता खेळ आठवला .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

आपली संस्कृती ते प्रगती - राजेश मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रा. लि.

  काल राजेश इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रा. लि. या वसईतील कामन विभागातील कंपनीला भेट देण्याचा योग आला. राजाराम फुलेजी यांना यावर्षी "महाराष्ट्र बिझनेस क्लब" प्रस्तुत "उद्योग गर्जना २०२५" मध्ये "उद्योगतारा" या सन्माननीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. अडवायजारी बोर्ड मेंबर महेश चव्हाण यांच्यामुळे राजारामजींची ओळख झाली होती. महेश कडून त्यांच्या कंपनीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि ते काल प्रत्यक्ष अनुभवायला मिळालं. वेळेच्या जवळपास पाऊणतास आधी आम्ही त्यांच्या फॅक्टरीला पोहचलो. वसई स्टेशन तिथून लांब असल्यामुळे कार घेऊन जाण्याशिवाय पर्याय नव्हता. माझ्यासोबत माझे मित्र आणि पार्टनर्स अमित देशमुख आणि अमित लाकरा होते. गेटबाहेरुनच कंपनीचा पसारा काय आहे याचा अंदाज आला. गेटपासून आतल्या भिंतीवर थोड्या थोड्या अंतरावर खूप चांगले मराठी / हिंदी असे मोटिव्हेशनल कोट्स लावले होते. आम्ही आत गेल्या गेल्या अकाउंट डिपार्टमेंट चे हेड आमच्याकडे आले आणि हात जोडून "गुड मॉर्निंग...वेलकम टू राजेश इंडिया" म्हणून आमचं स्वागत केलं. गाडी पार्किंग एरिया मध्ये पार्क करून आम...

जया अंगी मोठेपण....

  स्वतःच्या आवाजासाठी प्रसिद्ध असणाऱ्या हॅना चॅप्लिन यांच्या हाऊसफुल असणाऱ्या शो मध्ये परफॉर्मन्स करताना अचानक आवाज चिरकला आणि काही केल्या पुढील कार्यक्रम होईल याची शाश्वती नसताना विंगेत असलेल्या ५ वर्षाच्या चार्लीने तो परफॉर्मन्स आईऐवजी स्वतः करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून सोडले. हाच त्याच्या आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स. आईचा आवाज गेल्यावर पैसे यायचे बंद झाले आणि अत्यंत दारिद्र्यामध्ये आयुष्य काढावे लागले. दारूमुळे आपल्या आईशी घटस्फोट घेतलेल्या बाबांकडूनही पैसे येणे बंद झाले. आईने शिवणकाम करुन घर चालवण्याचा केलेला प्रयत्नही तितका यशस्वी होत नव्हता आणि त्यामुळे उपाशीपोटी राहण्याची सवय चार्लीला लहानपणापासूनच लागली. या सगळ्या घटनांमुळे चार्ली आणि त्याचा भाऊ सिडने याला वर्कहाऊसमध्ये जावं लागलं. तिथे स्वतःची चूक नसताना शिक्षा भोगाव्या लागल्या. यातच आईला वेडाचा झटका आला आणि ती वेड्यांच्या इस्पितळात दाखल झाली. कोर्टाच्या आदेशामुळे वडिलांच्या राहत्या घरात सावत्र आईसोबत काही दिवस काढावे लागले. इथे काम केल्याशिवाय चार्लीला जेवण सुद्धा मिळत नव्हतं. शाळेतून घरी येऊन त्याला काम...