Skip to main content

आनंदवन प्रयोगवन



व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा हेतू एकदा सापडला कि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण म्हणजे "कै. बाबा आमटे".

श्रीमंतीत वाढलेल्या आणि नंतर वकीली पेशात असणाऱ्या बाबांना एका पावसाळ्यात गटारात पडलेला कृष्ठरोगी दिसला ज्याच्या जखमांमधून अळ्या बाहेर येत होत्या.  पूर्ण शरीर उध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला पाहून आपण वकीली सोडून कृष्ठरोग्यांसाठी काहीतरी करावं हे त्यांनी निश्चित केलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली.  1949 मध्ये समाजाने नाकारलेल्या काही क्रुष्ठरोग्यांना एकत्र घेऊन वरोऱ्यात सरकारकडून मिळालेल्या एका जंगलातून त्यांनी आनंदवनाला सुरुवात केली.  याच असहाय्य रोग्यांच्या मदतीने तिथे एक मोठं गाव उभं राहिलं.  स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतः निर्माण केल्या जाव्यात म्हणून शेती, डेअरी, निरनिराळे उद्योग असं भलं मोठं साम्राज्य उभं राहिलं.  कृष्ठरोग्यांबरोबरच अंध, अपंग आणि समाजाने दुर्लक्षिलेले असे कित्येक लोक आनंदवनाचा आसरा घेऊ लागले.  विदर्भ असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तळी खोदली गेली, विहिरी खोदल्या गेल्या.  कोणत्याही संकटावर हातावर हात धरून न राहता नव्या प्रयोगांनी त्यावर मार्ग शोधण्याचं नेहमी काम झालं.  आनंदवनात आज स्वतःचे बरेचसे उद्योग, स्वतःच्या शाळा, कॉलेजेस असा मोठा पसारा झाला आहे.  फक्त आनंदवनाची प्रगती न करता आजूबाजूंच्या गावांची प्रगती कशी होईल यावरसुद्धा बरचसं काम आनंदवनाच्या सहकार्यांनी केलं.

"कृष्ठरुग्ण समाजाचं ऋण फेडतील", हे बाबांचं वाक्य आज पूर्णत्वाला आलय.  या कामात त्यांची मुलं डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांनी स्वतःला झोकून दिलं.  आता त्यांची पुढची पिढीसुद्धा तेच काम करते आहे.

ज्या स्वप्नात ताकद आणि खरेपणा असतो ते पिढ्यानपिढ्या चालत राहत हे या पुस्तकातून शिकण्यासारखं आहे. 

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...