Skip to main content

अर्धांगिनीस पत्र



10 वर्ष !!!  2007 ते 2017.

किती वेगळं आहे हे सगळं.  आपण प्रेमात काय पडलो...लग्न मोडता मोडता झालं काय आणि आता लग्न होऊन 10 वर्ष झाली.  किती सहज निघून गेली इतकी वर्षे.  आता आठवलं तर खरच इतका काळ लोटला आहे का असा प्रश्न पडावा इतक्या सहज.  

मला तो दिवस अजून आठवतो जेव्हा तू सकाळी 7 वाजता चेंबूरच्या आपल्या घरी मला सांगायला आली होतीस की आपलं लग्न होऊ शकत नाही.  त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुझ्या घरी आपल्याबद्दल समजल्यामुळे त्यांनी विरोध केला.  तुझ्या आईसाठी तू इमोशनल झाली होतीस.  त्या दिवशी किती रडली होतीस तू?  तुझं रडणं थांबावं म्हणून मी माघार घेतली आणि सांगितलं नाही करायचं लग्न.  (थोडक्यात हे मोडल्यासारखंच झालं).  हा सगळा प्रकार बघून माझ्या आईला टेन्शन.  तिला वाटायचं ही याच्या आयुष्यातून गेली तर हा देवदास होईल.  मग मी नंतर ऑफिसला सुट्टी टाकली.  मग 3-4 तास आपण एकत्र घालवल्यावर तुझा विचार पलटला आणि लग्न करायचंच असा ठाम निर्णय मला सांगितलास.  केवढे होतो आपण तेव्हा?  फक्त 21-22 वर्ष.  मी नोकरीला लागून नुकतेच 5-6 महिने झाले होते आणि पगार फक्त 5 हजार.  तुझा निर्णय परत घरी जाऊन बदलेल असं मला वाटलं होतं पण नाही झालं तसं.  तुझे पप्पा लग्नाची बोलणी करण्यासाठी माझ्या घरातल्याना भेटायला तयार नव्हते आणि मग तुझं लग्न ते परस्पर ठरवायला निघाल्यावर आपल्याकडे पर्याय नव्हता.  इतक्या लवकर लग्न व्हावं अशी माझी ईच्छा नव्हती पण लग्न करा किंवा विषय सोडून द्या अशी परिस्थिती आली.  मग निर्णय घेण्याशिवाय पर्याय नव्हता.  तुझ्यासारखी मला समजून घेणारी दुसरी मुलगी मिळणार नाही हे माझं मत होत (ते आजही तसच आहे.  दुसऱ्या कुणी मला आणि माझ्या वेडेपणाला कस सहन केल असत हा प्रश्न आहेच). कोर्ट मॅरेंज साठी 14 फेब्रुवारी तारीख ठरली.  

मी सहज विचारायचं म्हणून परागला आपल्या पत्रिकेबद्दल त्याच्या बाबांशी बोलायला सांगितलं होतं.  परागचे बाबा लग्नपत्रिका बघतात हे मला माहित होत.  परागला पण थोडं फार त्यातलं कळत होत आणि पत्रिका पाहिल्याबरोबरच त्याने सांगितलं की, "भारी मित्रा.  तुमच्या दोघांचे 36 च्या 36 गुण जुळतात."  मी भयंकर खुश झालो.  पण तो रात्री बाबांना पत्रिका  दाखवून कन्फर्म करणार होता.  मी रात्री निकालाची वाट पाहत सुभाषनगरच्या मैदानामध्ये  बसलो होतो.  पराग चा कॉल आला पण तो नाराज वाटत होता.  त्याने बाबांना फोन दिला.
"पत्रिका जुळत नाही.  36 गुण जुळतायत पण पत्रिकेत दोष आहे.  लग्न करणं योग्य नाही. पुढे मुलाबाळांसहित सगळे त्रास येणार", बाबांनी एकाच वाक्यात सगळं सांगून टाकलं.  तसा माझा विश्वास नव्हता या गोष्टींवर पण तूझ्या सांगण्यावरून मी ती पत्रिका दाखवली होती.  जेव्हा तूला मी ते सांगितलं तेव्हा पुन्हा एकदा तू ठाम होतीस.  "होईल ते बघू.  बाबांकडून उपाय घेऊ", ही तुझी वाक्य.  म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपलं लग्न व्हायचं होतच तर.

अगदी 13 तारखेपर्यंत नक्की नव्हतं की उद्या आपल लग्न होईल.  असं काहीतरी वेगळं आपल्या घरातल्यानी कधीच केलं नव्हतं त्यामुळे प्रत्येकाच्या मनात भीती होतीच.   दादाने तर विडाच उचललेला की लग्न व्यवस्थित पार पाडायचं.  अप्पांचे मित्र विजय काका यांनी या गोष्टीसाठी सपोर्ट दाखवला आणि दोन तीन मित्रांच्या अशा लग्नाचा अनुभव असल्याने धीरही दिला.  

"मुलगी नक्की तयार आहे का?  म्हणजे लग्नानंतर पोलीस कम्प्लेंट करावी लागते.  मुलीच्या घरातल्याना बोलावतात.  त्यात जर मुलीने स्टेटमेंट आपल्या विरोधात दिली तर तुझ्याबरोबर जेवढे लग्नाला होते तेवढे सगळे आत जातील किडण्यापिंग च्या केस मध्ये", विजय काकांनी हे सांगून धक्काच दिला होता.  तसं मला माझं टेन्शन नव्हतं पण घरातल्याना आणि मित्राना माझ्यामुळे त्रास होऊ नये अशी ईच्छा होती.  तू एकदा यात उडी घेतल्यावर मागे फिरणार नाहीस याबाबत माझा तुझ्यावर विश्वास होता आणि मी ते दादाला सांगितलेलं.  दादाने सांगितलं, "जे होईल ते बघून घेऊ.  फक्त प्रतिभाला डिसीजन सोडू नकोस सांग".

आदल्या दिवशी 13 तारखेला रात्री आई आणि मी जाऊन तुझ्यासाठी साडी आणि माझ्यासाठी शर्ट घेतला. हीच काय ती लग्नाची खरेदी.  आईने एक मंगळसूत्र बनवून ठेवलं होतच.  तशी आई खूप भित्री आहे पण याकाळात सगळ्यांकडेच एक वेगळीच एनर्जी होती.

सकाळी 7 ला तू नेहमी ऑफिसला निघायचीस तशी रेशनकार्ड घेऊन निघालीस.  7.30 ला कुर्ल्याला भेटायचं ठरलं होतं.  प्रत्येक कामात मी तुला गिफ्ट दिलेला मोबाईल उपयोगी पडत होता.  मी लग्नाचं जास्त कुणाला सांगितलं नव्हतं.  पण मित्रांपैकी अजय, तानाजी, पराग, जागृती हे आवर्जून येणारच होते आणि त्यांना सांगणं भागच होत.  दादाने त्याच्या मित्र मैत्रिणींना बोलावलं होत. लग्नाचे फोटो प्रूफ म्हणून लागतील म्हणून आपली पहिली लग्नाची ऑर्डर रूपेशला मिळाली.  तुझ्याकडून फक्त नम्रता आली होती.  कुर्ल्यावरून बसने आपण बांद्रा कोर्टात पोहचलो.  तिथे सगळी तयारी या सगळ्यांनी आधीच करून ठेवली होती.  आधी वैदिक पद्धतीने लग्न आणि मग कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन हा प्लॅन होता.  दादाने संजय गोविलकर दादांशी बोलून सगळी सेटिंग आधीच लावली होती.  एका छोट्याशा मंदीरात आपल्याबरोबरच अजून 3-4 जणांची लग्न होती.  तू मंदिरात आल्या आल्या आत तयारीला गेलीस.  आम्ही कितीही हसत खेळत होतो तरी मनात धाकधूक होतीच.  तुझ्या घरातल्याना कुठूनही समजलं आणि ते आले तर सगळं विस्कटणार होत.  भटजी पण आपल्याला अँटिक भेटला होता.  त्याने युपी बिहार स्टाइल मध्ये मंत्र बोलायला सुरुवात केली आणि तो जे काही मध्ये मध्ये सांगत होता ते मला काहीच कळत नव्हतं.  तू आलीस आणि नंतर लक्षात आलं की आपण मुंडावळ्या आणल्या नाहीत.  दादा अण्णाने धावत जाऊन कुठून तरी मुंडावळ्या आणल्या तोपर्यंत अर्ध अधिक लग्न उरकलं होत.  सप्तपदी तर आपण जवळ जवळ पळतच पूर्ण केली.  तुला मंगळसूत्र घालताना पुढे आयुष्यात काय होणार आहे त्याची काहीच कल्पना नव्हती.  मुलाचा मामा लग्नाच्या विधींसाठी  लागतो आणि योगायोगाने कमलाकर मामा गावावरून त्याच दिवशी आला होता.   सगळ्यांचे आशीर्वाद मिळाले.  लग्न पार पडलं. कोर्टात जाऊन रजिस्ट्रेशन करताना काही न्यूज चॅनेलवाले तिथे होते.  14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे असल्याने ते बरेच जण लग्न करतील असा त्यांचा अंदाज होता आणि ते जोडप्यांचे इंटरव्यू घ्यायला आले होते.  त्यावेळी आपल्याला लपवण्यासाठी सगळ्यांची चाललेली धडपड अजून आठवते.  दोघांनी तर मुद्दाम आपल्या गळ्यातले हार मागून घेतले आणि कॅमेरासमोर उभे राहिले.  रजिस्ट्रेशन झाल्यावर लग्नाचं जेवण कोर्टाच्या कॅन्टीनमध्ये.  आपण मसाला डोसा खाल्ला होता.  

सगळ झाल्यावर महत्वाचा भाग बाकी होता.  तो म्हणजे पोलीस एन सी.  आपण सगळे तसेच बसंत पार्क पोलीस चौकीत गेलो.  विजय काका आणि आप्पा आत बोलायला गेले.  तुला बाहेरूनच तुझ्या घरी कॉल करायला सांगितलं.  तू फोन केलास तो तुझ्या आईने उचलला.  "आई, मी सुबोधशी लग्न केलंय", तुझ्या पहिल्या वाक्यातच ठामपणा होता.  आईसाठी नक्कीच तो धक्का होता.  नंतर कॉल अमितने घेतला आणि साहजिकच तो तुझ्यावर वैतागला पण तू मागे हटली नाहीस.  तुझा माझ्यावरचा विश्वास त्यादिवशी मला ठळक दिसला.  नंतर आपल्या दोघांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं  गेलं.  हवालदार काका भयंकर गंभीर चेहऱ्याचे होते.  ती माझी आणि तुझी कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची पहिलीच वेळ.  हवालदार काकांनी एन सी लिहून घेतली आणि नंतर सब इन्स्पेक्टर साहेबांसमोर बसलो.  त्यांनी आपल्या समोर पुन्हा तुझ्या घरी फोन केला व लग्नाबद्दल कल्पना आहे का ते विचारलं.  काही आक्षेप असल्यास पोलीस स्टेशन ला या असही सांगितलं.  पण तुझ्या घरातल्यांनी गोष्टी मान्य केल्या व काही हरकत नसल्याचं सांगितलं.  आपण पोलीस स्टेशन मध्ये पेढे वाटायला सुरुवात केली.  बऱ्याच सिनिअर पोलिसांनी तोंडभरून आशीर्वाद दिला.  एक इंस्पेक्टर तर तुला म्हणाले होते, "तू मला मुलीसारखी आहेस.  याने काही त्रास दिला तर माझ्याकडे यायचं".  हा एन सी प्रकार जितका कठीण वाटला होता तितका झाला नाही.  तुझ्या ठामपणामुळे सगळं सुरळीत पार पडलं.

मग आपण घरी आलो.  चाळीत नेमक्या त्याच दिवशी पाणी लेट येणार असल्याने सगळ्या बायका बाहेर बसल्या होत्या.  मी आम्हा भावांमध्ये तिसरा आणि पाहिलं लग्न केलं म्हणून बऱ्याच टीका माझ्या माथी त्यावेळी आल्या.  चाळीत बातमी वाऱ्यासारखी पसरली.  "एवढी घाई होती काय रे? आधी भावाचं तरी होऊन द्यायचं" ही वाक्य तर माझ्या नेहमीच कानावर.  पण दुनियेची फिकीर मी कधीच केली नव्हती.  संध्याकाळी तुझ्या घरातल्यानी आमच्या घरी फोन केला आणि "प्रतिभाला घरी पाठवा आपण थोड्या दिवसांनी सगळ्यांना सांगून त्यांचं लग्न लावून देऊ असं सांगितलं".  तुझ्या घरातले खरच साधे असल्याने आपल्या घरातल्यानी आढेवेढे घेतले नाहीत.  सगळ्यांना लगेच तोंड कस देणार म्हणून तू घरी जायला घाबरत होतीस पण मैदानात उतारलोय तर लढुया अशा भावनेने तू तिकडे निघून गेलीस. नंतर पूर्ण 3 महिने तू तिकडेच होतीस आणि एक दिवस चांगला मुहूर्त बघून तुला इकडे पाठवल.  त्या 3 महिन्यात तू आपल्या प्रेमासाठी काय सहन केल असशील याची जाणीव मला आहे.  

त्यानंतर पण जवळपास आतापर्यंत तू खूप काही सहन केलंस.  माझ्या स्ट्रगलमध्ये मला तुझ्यासाठी काहीच करता नाही आलं.  तुझ्याही अपेक्षा कधी मोठ्या नव्हत्या.  तू माझं जग हळूहळू तुझं जग करत गेलीस आणि माझी प्रत्येक व्यक्ती तुझी झाली.  आजही आपण भांडतो पण ते सहसा मीच केलेलं असत.  आपण बोलणं बंद करतो पण माघार अजूनही तूच घेतेस.  तू इतक्या वर्षात स्वतःला खूप बदलत गेलीस आणि नवीन गोष्टी शिकत गेलीस.  तुला नाटकात काम करताना आणि पहिल्यांदाच नाचताना बघणं खरच खूप कौतुकास्पद होत.  आता तू तुझी जी ईच्छा आहे ती मला स्पष्ट बोलून दाखवतेस आणि माझाही प्रयत्न असतो की ती पूर्ण होईल.  तुला जे वाटत ते कर.  आयुष्याची पूर्ण मजा घे.  तू अशा वेळी माझ्या आयुष्यात आलीस जेव्हा मी कुणीच नव्हतो, आजही नाही पण तुझा सपोर्ट माझ्यासाठी कायम काहीतरी करून दाखवण्याची स्वप्न जागृत करतो.   तू माझ्यासोबत आहेस हीच माझ्यासाठी ग्रेट फिलिंग आहे.  अजून लग्नाच्या वाढदिवसाची बरीच दशकं आपल्याला एकत्र साजरी करायची आहेत.  त्यामुळे प्रत्येक गोष्टीत स्वतःची काळजी घेत जा.  कारण तू मला खूप म्हणजे खूपच महत्त्वाची आहेस.

लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा

तुझा,
सुबू


#sahajsaral

Comments

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...