महाभारतात श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला विराट रूप दाखवलं. संपूर्ण विश्वाचं दर्शन घडवलं. तेव्हा अर्जुन म्हणाला, "देवा, या विश्वात इतकं वाईट चाललंय. इतकी वाईट माणसे आहेत. तर मग हे जग कसं काय शाबूत आहे." त्यावर कृष्ण म्हणाला, "या जगात जशी वाईट माणसे आहेत तशी काही चांगली माणसे सुद्धा आहेत ज्यांच्या मुळे हे संपूर्ण विश्व चांगलं चाललय, शाबूत आहे." आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आजचे उत्सवमूर्ती हे या चांगल्या माणसांपैकीच एक! बाप म्हटल की कायम कुटुंबासोबत असणारा आधाराचा हात दिसतो. ज्यांनी दिवस रात्र काम करावं, गरज पडली तर कुटुंबापासून दूर राहावं, अतोनात मेहनत करून स्वतःची स्वप्न बाजूला सारून फक्त कुटुंबाच्या गरजा पूर्ण कराव्यात हे आमच्या आधीच्या जवळपास सगळ्या पिढ्यांच समीकरण. हल्लीची पिढी बाबाशी मैत्रीपूर्ण वागते, बाबाला अरे तुरे करते, प्रसंगी हक्काने भांडते, उलट बोलते. आमच्या पिढीने बाबांना नेहमी आदरयुक्त भीतीने पाहिले आहे. त्यांच्या नजरेत, आवाजात कायम जरब पाहिली आहे. प्रसंगी प्रेम आणि वेळोवेळी धाक पाहिला आहे. ही पिढी कदाचित मैत्रीपूर्...