काही दिवसांपूर्वी चौधरी बाईंनी फोन न करण्यावरून माझी कानउघडणी केल्यापासून केव्हा एकदा त्यांना भेटतो असं मला झालं होतं आणि शेवटी तो योग आला. घाटकोपरला "नन्ही कली" उपक्रमाचा सेशन संपवून बाईंच्या घरी जायचं ठरलं. बाईंना आदल्यादिवशी तशी कल्पना देऊन ठेवली होती. "मी कुठे जातेय. मी मोकळीच आहे. केव्हाही ये", बाईंच्या या उत्तराने आमची भेट पक्की झाली. बाईंना फोन केला तेव्हा बाई चेंबुरलाच शाळेसमोरच्या त्यांच्या जुन्या घरी मोठ्या मुलाच्या घरी होत्या. तिथूनच त्यांच्यासोबत देवनारच्या घरी जायचं ठरलं. त्यांना घेण्यासाठी गाडी घेऊन शाळेसमोर आलो. त्यांच्यासमोर हाफ पॅन्टवर फिरणारी आम्ही मुलं. मी गाडी घेऊन आलोय बघून त्या खूपच खुश झाल्या. त्या गाडीत बसणार म्हणून मलाही आनंद होताच. दरवाजा उघडून त्यांना गाडीत बसवलं. मागे प्रतिभा आणि त्या, पुढे मी आणि सार्थक. सातवीला चौधरीबाई आमच्या वर्गशिक्षिका होत्या. शाळेसमोरच त्यांचं घर. एकदा बाई आजारी म्हणून शाळेत आल्या नाहीत....