Skip to main content

हॅपी बर्थडे चिऊ

 



"चिऊ तू मला एवढा का आवडतोस?", या माझ्या प्रश्नावर "कारण तू माझा गोबू आहेस" हे तुझं मला मिठी मारून लाडात येणारं उत्तर मला कायम आवडतं. पप्पाचा सुबु आणि सुबुचा गोबू असा हा दहा वर्षाचा प्रवास. दहा वर्ष! तब्बल दहा वर्ष आपला प्रवास झालाय आणि अजून बराच बाकी आहे. तसं गुगल फोटोज रोज मला मेमरी मध्ये तुझे कित्येक जुने फोटो दाखवतच असतं. त्या प्रत्येक वेळी तुझं बालपण मी एन्जॉय करत असतो.
एप्रिल २०१० ला तुझ्या येण्याची चाहूल आम्हाला लागली आणि घरातलं वातावरण बदलून गेलं. घरात लहान पिल्लू येणार म्हणून सगळेच आनंदात होते. घरात सगळ्यात लहान तुझी तनू आत्या. त्यानंतर लहान बाळ आपल्या घरात कुणीच नव्हतं. तुझी मम्मी स्ट्रॉंग म्हणून तू पोटात असतानासुद्धा अगदी शेवटच्या महिन्यापर्यंत ट्रेनने प्रवास करून जॉब करत होती. तू मम्मी किंवा माझ्या किंवा आमच्या लग्नाच्या दिवशीच जन्माला यावंस ही आमची खूप ईच्छा होती. तुझी वळवळ जशी आता आहे तशीच तिच्या पोटात पण कायम होती. नोव्हेंबर २०१० चा अख्खा महिना तू तिला शांत एका जागी बसून दिलं नाहीस. मम्मीच्या वाढदिवशी तिच्या कळा सुरु झाल्याचा फोन मला सकाळी एका मिटिंगमध्ये असताना आला आणि मी ती मिटिंग अर्धवट सोडून हॉस्पिटलमध्ये पळालो. आपली ईच्छा पूर्ण होण्याची एकसाईटमेन्ट होतीच पण धाकधूक सुद्धा होती. संध्याकाळपर्यंत वाट पाहिल्यावर डॉक्टरने सांगितलं की आज तसं मुश्किल वाटत आहे तेव्हा मी हिरमोड होऊन तिकडून निघालो. तुझ्या मामाची आई तिथे होतीच. कामोठेला घरी आल्यावर मला आईचा फोन आला "वाघ झालाय" (तुझ्या मामाची आई तुला नेहमी याच नावाने हाक मारायची). ऐकल्याबरोबर घरात सगळ्यांना सांगून मी तसाच बाईक घेऊन अण्णाबरोबर कामोठेवरून चुनाभट्टीला निघालो. रात्रीचे साडेअकरा वाजले असतील. उद्या सकाळी जा असं घरी सांगत असतानासुद्धा आम्ही घाईत निघालो कारण तुला पहिल्यांदा पाहण्याची ईच्छाच तेवढी स्ट्रॉंग होती. हॉस्पिटलमध्ये एका टेबलवर हिरव्या कपड्यात तुला ठेवला होता. नुकताच या जगात आलेला भरगच्च केसांचा कावराबावरा तू, तोंडात बोट घालून एकाच ठिकाणी पाहत होतास. आम्ही असेपर्यंत शांत होतास पण जेव्हा आम्ही दरवाजा बाहेर आलो तेव्हा रडण्याचा खणखणीत आवाज आला. तुझ्या आवाजाचा अंदाज त्याच वेळी आला होता. आत असताना तुला उचलून हातात घेता आलं नाही पण तुझा फोटो क्लिक करता आला आणि त्या क्लिकबरोबर आपला एकत्र प्रवास सुरु झाला.
दुसऱ्या दिवशी काहीतरी छोटा प्रॉब्लेम असल्याने तुझा एक्सरे काढावा लागणार होता. तेव्हा भिंतीच्या आधाराने फक्त डोकं पकडून तुला उभं धरायचं होतं आणि ते मलाच करायचं होतं. तेव्हा तुझं रडणं आणि वळवळ बघून बाबाच्या मनातली कासावीस पहिल्यांदा अनुभवली. माझा नवा बिजनेस किंवा बऱ्याच इतर कमिटमेंटमुळे तुला जास्त वेळ देता आला नाही किंवा हवा तसा वेळ तुझ्यासोबत घालवता आला नाही. कदाचित दुर्लक्षही झालं असेल. एवढा लहान असूनसुद्धा कधी पटकन तुझ्यावर रिऍक्टही झालो. बाबा म्हणून याची गिल्ट फिलिंग मला कायमच आहे. मी खरंतर तुझ्या जास्त जवळ आलो बेलापूरला राहायला आल्यावर. तेव्हा तू जवळपास ३ वर्षाचा झाला होतास. पण त्यातही जबाबदाऱ्यांमुळे आणि कामाच्या लोडमुळे तुला हवा तसा वेळ देता येत नव्हता आणि आजही कुठेतरी तसंच आहे. त्याबद्दल मनापासून सॉरी! पहिली ५ वर्ष मुलांना प्रेमाने वाढवायचं, १६ वर्षाचा होईपर्यंत धाकात वाढवायचं आणि नंतर त्याचा मित्र बनायचं हा गुरुमंत्र मला गोविलकर दादांनी खूप वर्षांपूर्वी दिला होता. हा मंत्र तुझ्यावर वापरण्याची संधी तू गेल्या पाच वर्षात मला दिली नाहीस.
तुला कायम मी माझा गुरु मानतो. बऱ्याच गोष्टी तू तुझ्या वागण्या बोलण्यातून मला शिकवत आला आहेस. घरातल्या सगळ्यांना अभिमान वाटेल अशा गोष्टी गेल्या दहा वर्षात तू केल्या. तुझा ज्युनिअर केजीमध्ये दुसरा नम्बर आलाय हे तुझ्या सिनिअर केजीच्या फ़ंक्शनला जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा तुला अवार्ड घेताना पाहून समजलं. त्यानंतर सलग तू दरवर्षी वर्गात पहिलाच येत राहिलास. तू पाठ केलेली महाराष्ट्रातल्या रेल्वे स्टेशनच्या नावांची लिस्ट! आजही माझे कित्येक मित्र तुझ्या त्या व्हिडिओवरून कौतुक करत असतात. त्यांच्या मुलांना अभिमानाने तुझा व्हिडीओ दाखवतात. स्टेजवर उभा राहून बिनधास्त हजार लोकांसमोर काय घडाघडा बोलला होतास तू. त्या वयात माझी कधी शाळेच्या स्टेजवर जाण्याचीही हिम्मत झाली नव्हती. त्यानंतर तू केलेलं पत्त्यांच घर. ते किती वेळा पडलं आणि तू प्रामाणिक प्रयत्न करून अगोदर ४, नंतर ७, नंतर १० आणि नंतर १२ माळ्यांचं घर बनवलस. आम्ही कायम भिंतीचा सपोर्ट घेऊन पत्त्यांच घर बनवायचो पण तू कोणताही आधार न घेता एवढं मोठं घर बनवतोस. तुझं त्यासाठी मला कायम कौतुक वाटत राहिलं आहे. "ट्राय ट्राय करून कधीतरी बनतच किंवा किती वेळा पडलं तरी परत करायचं" या तुझ्या वाक्यातली ताकद तुला या वयात कळते म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. मोठे पप्पांना खुश करण्यासाठी तू केलेलं "ये सब फीझूल है शेहजादे" थिएटरमध्ये लोकांनी उचलून धरलं. एवढे कठीण उर्दू डायलॉग्स तू किती कमी दिवसात पाठ केले होतेस? चित्रकलेपासून पूर्ण लांब असलेला तू, लॉकडाऊन मध्ये कितीतरी भन्नाट चित्र किंवा क्राफ्ट्स करून आम्हा सगळ्यांना हैराण केलंस. एकदा ठरवलं कि तू ते करणारच हा विश्वास माझा तुझ्या बाबतीत प्रचंड आहे.
मी हट्टी मुलं बरीच पाहिली. तूसुद्धा हट्टी होतोस पण तुझा समजूतदारपणा त्याहूनही जास्त अधिक आहे. एखादी गोष्ट हवीच आहे म्हणून तुला कोणत्या दुकानासमोर पाय आपटत राहिलेलं मला आठवत नाही. घरात असेच पैसे मिळत नाही म्हणून तू अगदी लहान असल्यापासून अंथरून घालण्याची मेहनत करत राहिलास. त्यातल्या त्यात तुझ्या सातव्या बर्थडेला गल्ला ओपन झाल्यावर २५०० निघाले. यात तू अंथरून घालून झालेली कमाई, शाळेत पहिला आलास म्हणून शाळेतुन बक्षीस मिळालेले ७५० त्यात माझ्याकडून पहिल्या नंबरच बक्षीस अशी तुझी वर्षभराची मेहनतीची कमाई होती. पण तुला गुंतवणुकीचं महत्व पटवून सांगितल्यावर तू एका क्षणात तुझे पैसे म्युच्युअल फ़ंड मध्ये गुंतवायला तयार झालास आणि त्यानंतर प्रत्येक बर्थडेला तुझा गल्ला ओपन झाल्यावर तू सगळे पैसे माझ्या हातात देतोस. सात वर्षाचा असताना स्वतःच्या निर्णयाने गुंतवणूक सुरु करणारा लहानगा इन्व्हेस्टर तूच असशील. तुला पैशांचं महत्व कायम राहिलं आणि हिशोबसुद्धा कळत राहिले. अगदी ४-५ वर्षाचा असल्यापासून तू भाजीवाल्याना पैसे द्यायला पुढे आणि परत आलेले पैसे मोजून घेण्यात हुशार. जानेवारी मध्ये शाळेसाठी नवा शर्ट बाबांनी घ्यायचा म्हटल्यावर "कशाला बाबा? आता दोन महिनेच शाळा आहे. पुढच्यावर्षी घेऊ" असं म्हणणारा ७ वर्षाचा तू कितीतरी मोठा वाटलास मला. लहान मुलांना नव्या गोष्टींची आस असते. ती तुला का बरं नसावी? भांडुपला मेमरी टेक्निकचा संडे टू संडे कोर्स करताना, बेलापूर ते भांडुप तू थकला नाहीस. एकदा मेगाब्लॉकमध्ये ठाण्याला प्रचंड गर्दी असताना मी घरी परत जाऊ म्हटल्यावर,"पप्पा आपण एवढे पैसे भरलेत. कशाला फुकट घालवायचे? एवढं लांब आलोय. थोडंच राहिलंय", म्हणत तू मला विश्वास दिला होतास. तू अगदीच ३ चार वर्षाचा असताना तुझ्या पिगी बँकमध्ये साठलेले ८० रुपये तू मोठ्या पप्पांच्या गिफ्टसाठी दिले होतेस यात तुझ्या देण्याची वृत्ती स्पष्ट दिसून येते. "मोठे पप्पा, हे ला बु", म्हणजेच तुझ्या भाषेतलं "आय लव्ह यु" हे त्या गिफ्टवर तुझ्याच अक्षरात लिहिलं होतंस. एखाद्या बिजनेसच्या डिस्कशनमध्ये जेव्हा तू माझ्याशी प्रॉफिट-लॉस-इन्व्हेस्टमेंटच्या वार्ता करतोस तेव्हा तुझ्यातला उद्योजक दिसतो मला. हट्ट तू केलेस. लहान मुलांनी ते करायलाच हवेत. पण तू आहे त्यात समाधानी राहायला शिकलास. नको त्या गोष्टींचा जास्त आटापिटा नाही. इतर मुलांकडे बघून कोणत्याच गोष्टीच कम्पॅरिजन नाही. घरात लहान एकटाच आहेस याचा अवाजवी फायदा नाही.
तुला पहिल्यांदाच पत्र लिहिलंय कारण वयाची दहा वर्ष आज तू पूर्ण करतोयस. आता तुला कदाचित माझ्या भावना कळतील. तशा त्या तुला खूप आधीपासूनच कळतात. म्हणूनच मी थकलेला असल्यावर माझी मालिश किंवा हातपाय चेपण्याचं काम कंटाळा करून का होईना पण तू करतोस. मुलाला ठेच लागली की आई बाबांना त्रास होतो, इथे आम्हाला ठेच लागली कि तुला त्रास होताना पाहिलं आहे. मी बऱ्याच वेळेला तुझ्या काही गोष्टींच्या विरुद्ध असतो. प्रत्येक वेळी ते तुझ्यासाठीच असतं. तू कधी चिडतोस. कधी रुसतोस. कदाचित मला बाबा म्हणून समजून घ्यायला तुला अजून बराच वेळ आहे. तो माझ्या बाबांच्या बाबतीत मलासुद्धा लागला होता. तुला कोणतीही गोष्ट सहज मिळाली नाही आणि ती यापुढेही मिळणार नाही. कारण तुला प्रत्येक गोष्टीचं महत्व कळायला हवं. त्यामागची मेहनत कळायला हवी. तुझ्या चांगल्या नशिबाने आजी-आजोबा तुझ्यासोबत राहिले. त्यांच्या सहवासात तुला बऱ्याच गोष्टी लहानपनापासून शिकता आल्या. उत्तम संस्कार तुझ्यावर झाले. मोठ्या पप्पा आणि मोठ्या आईसारखे नेहमी इन्स्पायर काका-काकी भेटले. दीदीसारखी प्रेमळ बहीण आणि अण्णासारखा काका मित्र म्हणून भेटला. कोणत्याही आईने घ्यावी त्यासारखी किंवा त्याहूनही अधिक तुझी मम्मी तुझी काळजी घेते. आम्हा सगळ्यांना खात्री आहे की तू आयुष्यात जे काही करशील ते भन्नाटच करशील. ते करण्याची ताकद आणि बुद्धी तुझ्याकडे सुरुवातीपासूनच आहे. तू काय व्हावस हे ठरवण्याचं तुला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तुझ्या प्रत्येक गोष्टीत आम्ही कायम तुझ्यासोबत आहोत. पण स्वाभाविकच त्या प्रत्येक गोष्टीची मेहनत तुला स्वतःला घ्यायची आहे. आमच्या सगळ्यांचं तुझ्यावर खूप म्हणजे खूप प्रेम आहे आणि तुझ्या प्रत्येक गोष्टीबद्दल कायम आम्हाला तुझा अभिमान आहे.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चिवड्या! कितीही मोठा झालास तरी आमच्यासाठी पिल्लूच राहणार आहेस!
लव्ह यु अ लॉट!
---
तुझा,
पप्पा


Comments

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी