Skip to main content

एका तऱ्याची गोष्ट




“अरे नाय उलटणार साहेब...एकांद्या वेली कधी कधी पंदरा मानस घेऊन जातो मी...मदी मच्चीच्या टोकऱ्या पन असतात.  तुम्ही खाली पाट घेऊन बसा", एकदम आत्मविश्वासाने त्याने बंधाऱ्यापासून  पाण्याच्या दिशेला गेलेली होडी, हातातली काठी विरुद्ध बाजूला दाबून परत होडी बंदाऱ्याला टेकवली.  "बसा बसा काय होत नाय.  उधान येतंय दर्याला.   सगल्यानी एकदम बसा नायतर अर्धे अर्धे चला.", त्याने काठी दाबतंच आम्हाला सांगितलं.  "अर्धे अर्धेच जा.  अर्धी माणसं अजून यायचीत",  आबांनी शंभूला कडेवर सावरत आम्हाला सांगितलं.

केळशीला जायची ही माझी चौथी वेळ.  निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेल्या या गावाची ओढ सुटत नाही.  मावशी खाडीपलीकडच्या साखरी गावात असणाऱ्या एका आदिवासी पाड्यातील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून काम करतात. आबासुद्धा त्याच शाळेत शिकवायला होते.  पण तीन वर्षांपूर्वीच त्यांची रिटायरमेंट झाल्यामुळे मावशी आता एकट्याच शाळेत जातात.  तिकडची शाळा कशी असेल हे बघण्याची उत्सुकता आम्हाला होतीच पण त्यापलीकडे सार्थक आणि अश्मीला गावातली मुलं कोणत्या परिस्थिती शिकतात याची जाणीव करून द्यायची होती.  साखरीला जाण्यासाठी समुद्राला लागून असणारी खाडी पार करून नंतर एक छोटा डोंगर चढून  जावं लागणार होतं.  

"तुम्ही धरून ठेवा होडी...बाकीचे चढतील", बंधाऱ्यावर आपटणाऱ्या छोट्या लाटांमुळे हेलकावे खात होडी पुन्हा दूर जाऊ नये म्हणून तर्ह्याने सांगितल्याप्रमाणे मी होडी धरून ठेवली.  एक एक करून काही जण होडीत चढले.  समुद्राला भरती येऊ घातली होती.  मी आपला जीवाला जपून पुढच्या  टोकाला गॅपमध्ये खाली बसून राहिलो.    "घाबरू नका. काय होत नाय.  फक्त होडी जास्त हलून देऊ नका.  उधान आलंय.  मी नेतो बरोबर.",  त्याने सांगितल्याप्रमाणे सगळे जास्त न  हलता फोटो काढत होतेच.  मला असाही फोटोमध्ये इंटरेस्ट नसतोच त्यात जीवावर उदार होऊन अजिबात नाही.  होडी हळू हळू पाण्यातून पुढे सरकायला लागली होती.   उजवीकडे  आडवा मोठा  समुद्र, डावीकडे दूरपर्यंत जाणारी खाडी, समोर मोठमोठे डोंगर अशा निसर्गरम्य वातावरणात होडी पलीकडच्या किनाऱ्याकडे चालली होती.  मध्येमध्ये आमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी तऱ्याच्या गप्पा चालूच होत्या.  पलीकडच्या किनाऱ्यावर दगडाजवळ होडी लागली आणि पुन्हा एकदा सुरुवातीला उतरून होडी पकडण्याची जबाबदारी माझ्यावर  आली.  सगळे एकेक करून एकमेकांच्या आधाराने उतरले. "ते खोपटं दिसतंय काय...तीतून वर जावा.  तितच साखरीची शाला",  होडी पुन्हा किनाऱ्यापासून लांब नेताना तऱ्याने  आम्हाला सांगितलं.  "आम्ही इकडेच थांबतो झाडाखाली मावशी येईपर्यन्त", आम्ही त्याला सांगून शेतातल्या पायवाटेतुन झाडाकडे निघालो.   अजून होडी पुन्हा फिरून यायला अर्धा  तास होता तोपर्यंत आमचं झाडाखाली दोन दिवसात काढलेले फोटो बघणं, काजू गोळा करणं असा टाईमपास चालू होता.  काही वेळाने होडी आली.  आबा, मावशी, अजा, पूनम येताना दिसले.  तऱ्या पण त्यांच्या मागेच होता.  आर्या अजाच्या   खांद्यावर होती.  "पाणी आहे काय?", अजाने लांबूनच विचारलं.  पिण्याचं पाणी आम्ही कधीच संपवल होतं.  पाण्याची बाटली पाहिली तर शेवटचा घोट उरला होता.  बाटली अजाच्या हातात दिली.  "अरे मला नको.  होडीवाल्याला द्यायची आहे.    एवढंच उरलंय काय पाणी?", अजाच्या या प्रश्नावर नुसतीच होकारार्थी मान डोलावली.  उरलेली बाटली मी तऱ्याच्या हातात दिली.  "एवड्यान काय व्हायचं ?", म्हणत त्याने एका दमात घोट संपवला, "लवकर या जाऊन.  नास्ता पण नाय केला सकाली.  आता खायला गेलो तर लेट होईल गावातून यायला. तुमाला लेट होईल.  तुमाला केलशीत सोडून मग जाईन.  पान्याची बाटली तेवडी भरून आना", म्हणत बाटली त्यांनी हातात दिली व होडीकडची वाट  धरली.  आम्हीही डोंगर चढत शाळेची वाट धरली.  

शाळा  म्हणजे काय तर दोन छोट्या खोल्या होत्या.  वर्गात मुले म्युन्सिपाल्टीचा निळा ड्रेस घालून खाली चटईवर बसली होती.  सर शिकवत असतानाच नॉक करून मावशींनी आमची माहिती सरांना दिली आणि सार्थक आशूला बघायला बोलावलं.  आदिवासी शाळेतल्या मुलांची परिस्थिती जशी असायला हवी त्यापेक्षा खूप बरी होती.  पण पुस्तकं अक्षरशः चिंद्या झालेली.  कदाचित त्यांना जुनीच पुस्तकं वापरायला मिळत असावीत.  मावशींची अंगणवाडी थोडी पुढे होती.  मावशीचे विद्यार्थी फक्त दोनच.  एक मुलगा आणि एक मुलगी.  ते दोघेही आपल्या छोट्या भावांना शाळेत घेऊन आले होते.  फक्त दोन मुलांसाठी एवढा प्रवास करून रोज न चुकता शाळेत यायचं याबद्दल मला मावशीचं कौतुक वाटलं.  अंगणवाडीचा एकच वर्ग पण थोडा वेगळा होता.  आत टॉयलेट बाथरूमची व्यवस्था होती.  उंची मोजण्यापासून, वजन करण्यापासून,  फळाफुलांचा- आकड्यांचा ओळख तक्ता, खेळणी असं बरच साहित्य होतं.  झोपाळासुद्धा होता.  आमच्या चिल्लीपिल्लीने तिथे मजा करून घेतली.  मदतनीस म्हणून गावातल्याच एक बाई मावशीबरोबर होत्या.  रोज खिचडी बनवून आणून मुलाना खायला देणं हे त्यांचं काम.  त्यासुद्धा मुलांच्या मागे बसल्या होत्या.  मुलांची ओळखपरेड आमच्यासमोर झाली.  त्या चिमुकल्यानी न चुकता हाताची घडी घालत आपापली नाव, गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश सगळं सांगितलं.  निघताना आंगणवाडीची हजेरी  कशी लागते यासाठी सरकारने केलेलं मोबाईल अँप मावशीने आम्हाला दाखवलं.  त्यात मुलांच्या हजेरीपासून त्यांना गरम जेवण मिळालं का? अपेक्षित खाऊ त्यांना मिळाला का? यासारखे अनेक प्रश्न होते.  शेवटी मुलांचा काढून अपलोड करायचा होता.  डिजिटल इंडिया गावागावात पोचतेय हे पाहून बरं वाटलं.  मुलांनी आमच्यासमोरच खिचडीवर ताव मारला.  कदाचित शाळेत व्यवस्थित खायला मिळतं यासाठीच ते न चुकता येत असतील असं उगाच वाटून गेलं.







डोंगर जेव्हा खाली उतरलो तेव्हा तऱ्या तिथेच किनाऱ्याशेजारी बसला होता.  भरून आणलेली बाटली कुणीतरी त्याच्या हातात दिली तशी त्याने घटाघटा पिऊन टाकली.  पुन्हा अर्ध्या लोकांना घेऊन होडी निघाली.  मी, मावशी, अजा, पूनम, प्रतिभा मागे राहिलो.  उन्हापासून वाचण्यासाठी किनाऱ्याला एक शेड बांधली होती तिथे जाऊन बसलो.  बाजूलाच जाळं टाकून बसलेल्या गावातल्या माणसाच्या जाळ्यात एक खेकडा सापडला आणि त्या जाळीसकट त्यांनी तो आमच्यासमोर आणला.  मुलं खेकडा बघून खुश होतील या विचाराने मावशीने "आम्हाला देतोस काय ?" असं विचारल्यावर, "जावा घेऊन.  अजून गावले होडी येईस्तोवर तर ते पन देतो" म्हणत त्याने खेकड्याची नांगी विशिष्ट पद्धतीने लॉक केली आणि बाजूला पडलेल्या एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून आम्हाला दिला.  मावशी आणि आमच्या इकडच्या तिकडच्या गप्पा सुरु होत्या.  "हे होडीवाले किती घेतात एका फेरीचे?", मी सहज विचारलं.  

"दहा घेतो.  राउंड ट्रिप वीस रुपये.  पण काय त्याचा उपयोग?  दिवसाला फक्त आम्ही तीन शिक्षक असतो.  सकाळी सोडतो  आणि शाळा सुटेपर्यंत थांबून राहतो बिचारा.  आम्हाला सोडल्यावर घरी जातो", मावशी सांगत होत्या.

"म्हणजे दिवसाला फक्त साठ रुपये?", मी लगेच आकडेमोड केली.

"कधी त्यापेक्षा पण कमी.  सुट्टीत तर कुणी असेल तरच", मावशींनी सांगेपर्यंत दुसरा खेकडा त्या माणसाने आमच्याकडे आणला होता आणि होडीही आली होती.  माणसं जास्त नसल्याने आता होडीत बिनधास्त बसलो.  पण आता लक्ष फक्त तऱ्याच्या हालचालीकडे होतं.  साठीला आलेल्या त्याला उपाशीपोटी फक्त एवढ्याश्या कमाईसाठी इतकी मेहनत करावी लागत होती.  पण चेहरा पूर्णपणे प्रसन्न आणि हसरा होता.  महिन्याला येईल तेवढं इन्कम कमी पडणाऱ्या, ई. एम. आय., लाइफस्टाइलच्या जाळ्यात अडकलेल्या मला त्या तऱ्याचा, त्या अंगणवाडीत जगाचा विसर पडून खाणाऱ्या मुलांचा आणि आपल्या हातात आलेलं अन्न काहीही आढेवेढे न घेता  दुसऱ्यांच्या हातात आनंदाने देणाऱ्या त्या गावातल्या माणसाचा काही क्षण हेवा वाटून गेला.

Comments

  1. खूप सुंदररित्या उतरवलेलं आहे, नुकतीच साठवलेली मनातील आठवण. एवढ्या माणसांच्या जबाबदारीची जाणीव ठेवून त्या होडीवल्या बाबांनी अर्धेच बसा, हलू नका अशा सूचना येत होत्या. नंतर मावशी आबा संभाजी घेऊन पुढे गेल्या तेव्हा काजूच्या बिया मी आणि सार्थक शोधत होतो. तिथे ते होडीवाले बाबा आले आणि सांगत होत, या केलटानि नासाडी केली हो सगळी फल खाऊन टाकली आणि ते सुद्धा बिया शोधायला लागले आणि बाय हे घे असा बोलून मला त्यांनी जमवलेल्या बिया दिल्या
    आणि सांगितलं लवकर या हो जाऊन मला पण घरी जायचाय.
    "कोकणची माणसं साधी भोळी" ही गाण्यातील ओळ खरंच प्रतीत होत. मावशी आबा, होडीवाले बाबा, खेकडा देणारे सगळेच साधेभोळे देत राहणारे.

    या गावाला कितीही वेळा आलो तरी मन भरत नाही म्हणून पुन्हा 3-4 महिन्यात येऊ असं सांगून आलोय.

    तुझ्या या लेखातून पुन्हा एकदा आठवणींतील केळशी प्रवास झाला. खूप मस्तच😊

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी