"पप्पा, त्या डेअरीवाल्याचे दहा रुपये उधार राहिलेत. मी दूध आणलेलं ना मागे त्याचे", बाबांनी बिल्डिंगखालून अंडी आणायला पैसे दिले होते, त्यात दहाची नोट पाहून सार्थकला ते आठवलं असेल. "बाबू लेट होतंय...जा आधी खाली", बाबांचा मागून आवाज ऐकून तो तिथून लगेच निसटला. मीसुद्धा फारसं लक्ष दिलं नाही. दुपारी शाळेची तयारी करताना त्याला पुन्हा एकदा आठवण झाली. "माझ्याकडे तेव्हा ४० रुपये होते. मी त्याला बोललो आप उधार दो मै आपको लाके देता हू आणि विसरलो", तो शर्ट घालता घालता मला सांगत होता. "उधार का घेतले तू? घरी येऊन परत घ्यायचे दहा रुपये आणि मग जायचं", उगाच उधारी वैगेरे प्रकार या वयात कसे मुलांना कळतात या भावनेने त्रासून बोललो. "अरे मी त्याला ४० रुपये दिले होते दूध आणायला मग पन्नास कसे जातील?", बाबांचा किचनमधून आवाज आला. "अहो पप्पा, मी म्हैशीच दूध आणलं. गायीचं नव्हतं. म्हणून पन्नास गेले", त्याची तयारी चालूच होती. "कुणाकडून उधार घ्यायचं नाही. पैसे कमी पडले तर घरी येऊन घेऊन जायचं. डेअरी एवढी लांब आहे का? शाळेत जाताना बघूया",...