Skip to main content

लहानगा इन्व्हेस्टर



======================================================================
नमस्कार,

आपल्या घरात लहान मुलं असतील तर त्यांना सहज खर्चाला पैसे देणे किंवा त्यांचे हट्ट पुरवणे हे अगदी कॉमन आहे.  पण याचबरोबर ती मुलं हट्टी होणार नाहीत किंवा त्यांना पैशाची किंमत कळेल याची काळजी घेतली पाहिजे.  लहान वयात मुलांना गुंतवणुकीच महत्व पटवून दिलं तर त्यांना पूर्ण आयुष्य सुखात जगण्यात काहीच त्रास होणार नाही हे नक्की.  मी ते कसं करतोय या अनुभवावर माझा हा लेख.

=====================================================================

"अरुण अंकल, आज मेरा बर्थडे था ना तो मेरा पिगी बँक ओपन किया है| टू थाउजंड फोर हंड्रेड फोरटी रुपीज निकला है|  मै पप्पा के पास भेजता हु| आप मेरे अकाउंट मे डाल देना|", सार्थकने मी विसरेन या विश्वासाने डायरेक्ट अरुण सरांना फोन करून माझ्याकडून पैसे घेण्याची सूचना आधीच देऊन ठेवली.  हे पैसे त्याच्या म्युच्युअल फ़ंड अकाउंट मध्ये फिरवायचे होते.  खरं तर त्याचा अकाउंट उघडायला एक वर्ष लेटच झालं होतं.

सातव्या वाढदिवसाला जेव्हा त्याने त्याचा गल्ला फोडायला सांगितला तेव्हा तो खूप खुश होता.  गल्ल्यातून मिळणाऱ्या पैशाचं काय काय करावं हे प्लॅंनिंग आधीच ठरलं होतं.   तसं वागणंसुद्धा साहजिकच होतं. कारण मिळालेले पैसे सहज नव्हते.  शाळेत पहिला आला म्हणून शाळेचं बक्षीस 750, ते सरळ गल्ल्यात गेले.  घरात सहज कधी पैसे मिळतंच नव्हते.  काम केल्यावरच पैसे मिळतील हा सरळ हिशोब होता.  त्यामुळे बऱ्यापैकी रक्कम मेहनतीचीच.  त्यात बाबांनी कधी असेच खुशीत दिले तर नाहीतर मग कधी चुकून एक्स्ट्रा चिल्लर उरली तर मी द्यायचो.  त्याला गल्ल्यात किती पैसे असतील याचा अंदाज आधीच होता.  दोन हजार दोनशे पन्नास निघाले आणि हा खुश झाला.  त्याने पैसे खर्च करावेत ही माझी ईच्छा नव्हती म्हणून त्याला एकदा समजावून बघावं असा विचार मनात आला.  ते तितकं सोप्प नव्हतं म्हणा.

"सार्थक, तुझ्याकडे दोन ऑप्शन्स आहेत.  एकतर तू एवढी मेहनत करून पैसे कमवलेस.  तू आता काहीतरी अशी गोष्ट घेणार ज्याची तुला खरोखरच गरज नाही.  जेव्हा असते तेव्हा मम्मी पप्पा घेतातच.", त्याला माझ्या मांडीवर बसवून त्याला समजावण्याचा सुरात सांगत होतो.

"पप्पा आता तुम्ही मला पैसे खर्च करू नको असं सांगू नका प्लिज.  आपलं ठरलं होतं", तो तक्रारीच्या सुरात माझ्यावर बरसला.

"मी असं म्हणतच नाही.  पण बघ ना वर्षभर पैसे एकाच गल्ल्यात राहून तेवढेच राहिले.  वाढले का?  पण मी तुला अशी आयडिया देतो जिथे तू पैसे खर्च न करता ठेवलेस तर पुढे जाऊन तुझे पैसे आपोआप वाढतील", मी समजावणीचा सूर सोडला नाही.

"कसे?", या प्रश्नात अविश्वास होता.

"म्युच्युअल फ़ंड म्हणून असतं.  त्यात तू नियमित पैसे टाकत राहिलास ना की तुझी रक्कम काही वर्षात वाढते.  पण नेहमी टाकावे लागतात.", माझ्या या वाक्यावर तो चटकन मागे फिरला.

"लाखभर होतील?", त्याचा हा प्रश्न माझ्यासाठी थोडा अनपेक्षित होता.

"हो. काही तू टाकायचेस काही मी आणि मम्मी टाकणार.  तू दहावीला जाईपर्यंत होतील.  पण प्रत्येक वर्षी तुला पिगी बँक फोडल्यावर पैसे टाकावे लागतील", त्याला पटत होतं पण मी त्याला गुंडाळतोय का असा अविर्भाव चेहऱ्यावर होता.  मी सरळ अरुण सरांना फोन लावला आणि त्यांना परिस्थिती समजावली आणि सार्थकला बोलायला फोन दिला.  अरुण सरांनी टेक्निकल भाषेत पैसे कसे वाढतील हे त्याला समजावून सांगितलं पण त्याच्या डोक्यावरून गेलं होतं.  पैसे वाढतात एवढंच त्याला समजलं.

"करोडपर्यंत होतील?", सार्थकच्या या प्रश्नावर अरुण सर आणि आम्ही सगळेच हसायला लागलो.  

"हा बेटा होणार.  पण पैसे उगाच खर्च नाही करायचे.  इकडे गुंतवायचे", अरुण सरांनी समजावून सांगितलं.  आता निर्णय झाला होता.  सगळी कॅश माझ्या हातात आली.  नंतर अकाउंट ओपन करायचा म्हणून वर्षभर राहूनच गेलं.  दुसरा बर्थडे जवळ आला म्हणून पुन्हा घाई केली आणि त्याची इन्व्हेस्टमेंट सुरू केली.  वर्षभरात दोन तीन वेळा "पप्पा किती वाढले असतील ओ?" असा त्याचा प्रश्न आला पण "दहावीपर्यंत बघायचं नाही", असं सांगून मी टाळलं होतं.  जर अजून अकाउंट उघडला नाही असं सांगितलं असतं तर पुन्हा तीच गोष्ट त्याला पटवून द्यायला वेळ लागला असता.  या एकाच कारणासाठी त्याच्याशी खोटं बोलावं लागत होतं.    आठव्या बर्थडेला गल्ला फोडला आणि कॅश मोजल्याबरोबर त्याने सरळ अरुण सरांना फोन लावून हिशोब सांगितला होता.

"आपके बेटे का व्हिजन बडा है, बडा आदमी बनेगा", अरुण सर मला हसत सांगत होते.

माझ्या मुलाला पैशाची किंमत कळावी हा विचार पूर्वीपासूनच होता.  नको तिथे नको तेवढे पैसे देऊन उगाच लाडवायचं नाही आणि नको ते हट्ट पुरवायचे नाहीत ही पद्धत सुरुवातीपासूनच ठेवली आणि त्याचं बालपणसुद्धा त्याला मनापासून जगता आलं पाहिजे हा प्रयत्नसुद्धा होताच. कदाचित त्याचमुळे इतक्या लहान वयात गुंतवणुकीसाठी त्याला तयार करताना फारसा त्रास झाला नाही आणि अरुण सरांकडेसुद्धा त्यांच्या अडीज हजार कस्टमरमधून स्वतःच्या मर्जीने गुंतवणूक करणारा लहानगा इन्व्हेस्टर हा पहिलाच होता.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. छान सवय लावली सर मुलाला आणि सुंदर लेख आहे

    ReplyDelete
  2. खूप छान लिहलं आहेस, पैसे उगाच खर्च करायचे नाहीत हा माझा मुळातच कटाक्ष असतो. त्याला लहानपणा पासून पैशाची किंमत कळावी म्हणून काम केले तर पैसे मिळतील असं बजावून सांगितले आणि त्याने कमावले ही आणि ते त्याने गल्यात टाकलेही. खरंच हुशार, समजूतदार आणि ऐकणारं बाळ आहे माझं.....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अडोलसन्स

  अडोलसन्स एक वेगळा विषय म्हणून बरीच चर्चा झालेली अडोलसन्स ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज पाहिली. अगदी मोजक्या ४ एपिसोडमध्ये विषयाचं गांभीर्य मांडण्यात दिग्दर्शक आणि टीम यशस्वी झाली आहे. एक जेमी नावाचा १३ वर्षाचा मुलगा आपल्याच वर्गातल्या मुलीचा खून करतो आणि त्याबद्दलच्या इन्वेस्टीगेशन बाबतीतच ही वेबसिरीज आहे. पहिल्या एपिसोडमध्ये अटक, दुसऱ्या एपिसोडमध्ये शाळेचं वातावरण, तिसऱ्या एपिसोडमध्ये जेमीची मानसिकता आणि चौथ्या भागात जेमीच्या कुटुंबियांना समाजाचा होणारा त्रास अशा सगळ्या अँगलना कव्हर करत ही वेबसिरीज आपल्याला विचार करायला भाग पाडते. अगोदर नाटकासारखी रिहर्सल करून सलग शूट झालेला प्रत्येक एपिसोड असल्यामुळे आणि कलाकारांच्या अभिनयामुळे अजून जिवंतपणा आणि नैसर्गिकता येते. मुलं लहान असल्यापासून पालक म्हणून त्यांच्या हातात मोबाईल देणारे आपण त्यांना कायम मॉनिटर्ड ऍक्सेस देणं विसरतो आणि मुलांची प्रायव्हसी म्हणून आपण त्यांना पूर्ण स्वातंत्र्य देतो. मुळात ते द्यायलाच हवं पण ते एका विशिष्ट वयानंतर. पौगंडावस्थेत असताना (खासकरून १२ ते १७ वयोगट) आपल्यासमोर अगदी सहज वावरणारी बरीच मुले इंटरनेटच्य...

पुंडलिक सदाशिव लोकरे

  ऑक्टोबर २००९ मधली आमची पहिली भेट. बिजनेस नेटवर्किंगची माझ्या आयुष्यातली पहिली मिटिंग. मी हिमतीने एका अमिताभसारख्या उंची असणाऱ्या आणि तसाच धीरगंभीर आवाज असणाऱ्या पुंडलिकशी संवाद साधला. पण तो पहिल्या भेटीत काही मला रुचला नाही. पुढे मिटींग्सच्या निमित्ताने वरवर भेट होत राहिली. पण एकदा त्याच्या ऑफिसमध्ये त्याच्याशी बराच वेळ संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यात हा फणसारखा माणूस मला उमगला. बाहेरून काटेरी जरी भासवत असेल (तो भासवतो पण तसा नाही तो) तरी आतून इतका गोड की त्याच्यासारखा माणूस मला आजतागायत सापडला नाही. आयुष्यातले बरेच चढउतार पाहिल्यावर अगदी स्पष्टवक्तेपणा आणि कणखरपणा आलेला पुंडलिक मला कधी कुणाची उगाच स्तुती आणि त्यावरूनही निंदानालस्ती करताना आढळला नाही. जे आहे ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडावर सांगून मोकळा झाला. त्यामुळे मनात एक आणि बाहेर एक अशा द्विधा मनस्थितीत मला तो कधी दिसलाच नाही. तो ज्यांना कळला ते त्याचे एकदम खास झाले आणि ज्यांना नाही ते त्याच्या वाटेला थांबलेच नाहीत. तो मला भावला आणि माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला. पुंडलिक सर ते पुंडलिक हा प्रवास काही दिवसा...

येताव

  सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ आणि सुवर्णमहोत्सवी मालवण व्यापारी संघ यांच्या सौजन्याने "येताव" या आपल्या ऍपला पुन्हा एकदा नवसंजीवनी मिळाली. गेल्या काही वर्षात नावाजलेले व बऱ्याच न्यूज चॅनेलने / न्यूज पेपरने कव्हर केलेले पण या ना त्या कारणाने येताव ठप्प झाले होते. स्वामींच्या मठात आनंद दादाने याबाबतीत स्वामींना मनापासून आवर्तने केली होती. त्याची हाक स्वामींपर्यंत पोहचली. काही दिवसांपूर्वी नितीन वाळके सरांचा फोन आला की "मालवणात रिक्षा स्टैंड वर उभ्या असतात तर प्रवासी त्यांच्यापर्यंत आपल्या येताव ऍपद्वारे पोहचू शकतील का?". हा प्रश्न मालवणमधील रिक्षा चालक संदीप गावकर भाऊ यांनी नितीन सरांकडे मांडला होता. इथून या संकल्पनेवर नितीन सरांच्या मदतीने काम चालू झाले आणि ते प्रत्यक्षात उतरले देखील. हे ऍप रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यासाठी मोफत उपलब्ध करून देण्याचा मानस होता. प्रोसेस तशी सोपी होती, रिक्षा वाले ज्या स्टँडवर आहेत ते लोकेशन त्यांनी ऍपवर सेट करावे आणि पॅसेंजर ने त्या लोकेशनला सर्च केले तर त्यांना तिथे उपलब्ध असलेले रिक्षाचालक दिसावेत आणि त्यानी रिक्षाचा...