Skip to main content

मेडिसिन बॉक्स


========================================================

नमस्कार,

आयुष्यातलं सगळ्यात जास्त गृहीत धरलं जाणारं नातं म्हणजे आई-बाबा.  आपण नकळत त्यांना दुखावून जातो पण त्यांच्या लेखी क्षमा हा शब्द कायमच आहे.  "तुम्ही कधी म्हातारे नाय होणार काय रे भाडखाऊ?", हा नाना पाटेकरांचा "आपला माणूस" चित्रपटातला संवाद यावेळी आठवतो.  आपण सगळं करत असताना खरंतर कुठेतरी कमी पडतो याची मला झालेली जाणीव म्हणजे हा लेख

=========================================================


"या गोळ्या कुणी टाकल्या यात नवीन?", आईच्या मेडिसिन बॉक्समध्ये इव्हनिंग सेक्शनमध्ये गोळ्या पाहून मी विचारलं.  तिला गोळ्या वेळच्यावेळी खायला समजत नाही म्हणून आठवडभराचं सकाळ दुपार संध्याकाळ असे स्लॉट्स असलेलं एक मेडिसिन किट बॉक्स मी दहा दिवसापूर्वी घेऊन आलो होतो.  त्यात सगळ्या गोळ्या सकाळ आणि संध्याकाळच्या कापून ठेवल्या.  आपण बोलताना ती दुसऱ्याच विचारात असते म्हणून तिला तीन वेळा समजावून सांगितलं.  आज आठवडा संपला म्हणून आठवडभराच्या गोळ्या पुन्हा भरायच्या म्हणून पाहिलं तर आठवड्याभराचे एव्हीनिंग ब्लॉक्स सगळे भरलेले होते.

"तूच सांगितलंस ना आठवडभराच्या या खालच्या गोळ्या घ्यायच्या आणि मग नंतर या वरच्या", आईचा आवाज आता कापरा झालाय.

"मी कधी म्हणालो?  मी उलट तुला कितीवेळा समजावून सांगितलं.  सकाळ दुपार आणि संध्याकाळ आहे म्हणून", एवढं करूनही गोळ्या व्यवस्थित खाल्ल्या जात नाहीत म्हणून मी थोडा वैतागलो होतो.

"तू ओरडू नको रे बावा.  माझा उगाचचा गोंधळ होतोय आधीच.  तू त्यादिवशी सांगितलंस तशाच घेतल्या.  तरी मी विचारतेय रात्रीच्या गोळ्या कशा नायत ते.  पन कोन सांगतंय", ती हतबल झाल्यासारखी बोलत होती, "तू असताना पन विचारलं".

"कधी?", माझा सूर तोच.

"तुझं लक्ष असतं कामात असताना?  मीच आपलं बोलत राहायचं.  विचारलं की चिडतोस अजून म्हणून विचारायला पन नको वाटतं.  बाबा तू एवढे डॉक्टर बिक्टर करतोस ते कळतं मला. पन मला या गोळ्याबिळ्यांचाच कंटाळा आलाय.  आता कूटली खायचीय ती दे.  नाश्ता नाही केला अजून मी", असं बोलून तीने पदराने डोळे पुसले आणि गोळ्यांसाठी पानी घ्यायला उठली.  "तू नाश्ता करून घे.  नुसती बिस्कीट खाऊ नको.  भाजी चपाती देऊ काय तुला?  नाहितर जाशील असाच", आता जसं काही घडलंच नाही यापद्धतीत तिचं किचनमधून बोलणं पुन्हा सुरू झालं.  नको म्हणून मी किचन मध्ये गेलो आणि चहा गरम करायला ठेवला.  मी तिची डायबेटीसची गोळी तिला काढून दिली आणि यावेळी पुन्हा शांतपणे तिला समजावून सांगितलं.

मी चिडतो म्हणून मला आठवडाभर विचारलं नाही हे कुठेतरी खोलवर लागलं.  तिचं काय चुकलं?  ती शिकलेली नाही.  त्या बॉक्सवरचं इंग्लिश तिला समजत नाही.  रंगाप्रमाणे सांगितल्या तशा गोळ्या तिने घेतल्या असणार.  पण आठवडाभरात एकदाही मी वेरीफाय करू शकत नव्हतो की ती नक्की बरोबर घेतेय का गोळ्या?  फक्त ते मेडिसिन किट आणलं की माझं काम संपलं? एवढा बिजी आहे मी? तिने विचारल्यावर चिडण्यामागचं कारण काय? लहानपणी मी तिला किती प्रश्न विचारले असतील? आज माझं अस्तित्व कुणामुळे आहे? आज जर तिच्यासाठी मला काही करण्याची संधी मिळतेय तर उपकार करतोय अशी भावना तिच्या मनात माझ्याबद्दल निर्माण होतेय का? काळजी करणं म्हणजे फक्त डॉक्टरकडे नेणं आणि आणण एवढंच? की ती इतकी वर्ष कायम आजारीच म्हणून तिला गृहीत धरतोय आम्ही?  असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात घोळायला लागले.  बऱ्याच दिवसांनी मला स्वतःचा राग आला.  काही नात्यांमध्ये "थँक यु" किंवा "सॉरी" म्हटलं जात नाही.  माझं आणि आईचं तसंच आहे.  हे दोन्ही शब्द वागण्यातून जाणवतात.

"आज संध्याकाळी आलो की मला खाण्यापूर्वी सांग गोळ्या", मी तिला सांगितलं.

"एकदा सांगितल्या तर घेईन बरोबर", ती नॉर्मलच होती. इतक्यात सोसायटीत कपडे भांडीवल्याचा आवाज आला.  खिडकीत जाऊन तिने त्याला आवाज दिला आणि वर बोलावलं.  नंतर कपाटातले जुने कपडे काढण्यात आणि पुन्हा नवी प्लॅस्टिकची भांडी मिळतील या  नादात ती आता घडलेलं सगळं विसरुन गेली.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. खूप मनाला बोचेल असं लिहिलं आहेस, खरचं आपण खूप बिझी असल्यासारखं वागतो केव्हा केव्हा. छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष देत नाही. नंतर वाईट वाटतं की हे करायला हवं होतं, अस बोलायला नको होतं. नक्कीच यापुढे त्या गोष्टींची काळजी घेतली जाईल. ते दोघे आपल्या घरासाठी आपल्यासाठी खूप करतात, आपल्या सगळ्यांची काळजी घेतात.
    त्यांना अजिबात कोणताही त्रास व्हायला नको आहे.

    ReplyDelete
  2. खूपच छान आईची बाबांची आठवण झाली

    ReplyDelete
  3. क्या बात है यार सुबु! सहज सरळ थेट काळजाला हात घालणारं आणि खाडकन जागं करणारं लिखाण! लब यू सुब्बू!! तुझ्यासारखा भाऊ असणं हे भाग्यच!!!

    ReplyDelete
  4. क्या बात है यार सुबु! सहज सरळ थेट काळजाला हात घालणारं आणि खाडकन जागं करणारं लिखाण! लब यू सुब्बू!! तुझ्यासारखा भाऊ असणं हे भाग्यच!!!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...