Skip to main content

डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या चरित्र कथेवरून शिकण्यासारख्या १० गोष्टी




मी चित्रपट खूप कमी पाहतो.  बऱ्याच जणांकडून रिव्ह्यू घेऊन जर खूपच चांगला फीडबॅक असेल तरच सहसा.  पण "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" या चित्रपटाचा रिव्ह्यू घेण्याचा प्रश्नच आला नाही.  ट्रेलरच इतका जबरदस्त होता की हा सिनेमा बघायचा मोह आवरला नाही. फर्स्ट डे फर्स्ट शो बघण्याचा मुहूर्त लाभला.  चित्रपट अप्रतिमच आहे.  तो नाट्यभूमीचा काळ मांडण्यात दिग्दर्शकाला यश आलंय आणि त्यातही सर्वच कलाकारांची भूमिका अप्रतिम.  या चित्रपटातून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यातल्याच काही तुमच्यासाठी.


१. तीच गोष्ट करा ज्यात तुमचं मन तुम्हाला साथ देतं
व्यवसायाने डेंटिस्ट असून सुद्धा स्वतःची प्रॅक्टिस सोडून डॉक्टर नाट्यभूमीकडे वळले.  फक्त पोटापाण्यापुरतं न जगता आपण काहीतरी मोठं करू शकतो हा आत्मविश्वास त्यांना होता.  घरातल्यांचा विरोध असूनसुद्धा त्यांनी ही जोखीम पत्करली होती.  नंतर सिनेमामध्ये यश मिळूनसुद्धा ते खूप आनंदी नव्हते कारण त्यांचं मन रंगभूमीवर जास्त रमत होतं. त्यात आवडलेला एक संवाद, "आपलं मन रमतं त्या क्षेत्रात अपयश मिळण्यापेक्षा ट्रॅजिक असतं आपलं मन रमत नाही त्या क्षेत्रात यश मिळणं"

२. बऱ्याच वेळेला संधी निर्माण करावी लागते
"रायगडाला जेव्हा जाग येते" या नाटकात संभाजी महाराजांच्या प्रमुख भूमिकेचं ऑडिशन चालू असताना व्यक्तिमत्वामध्येच संभाजी महाराज न दिसणाऱ्या डॉक्टरांना नाकारण्यात आलं.  त्यावर  आपल्या संभाषण कौशल्याने त्यांनी विजय मिळवला.  पण जेव्हा मास्तर दत्ताराम त्यांचं ऑडिशन घेत होते तेव्हा डॉक्टरांनीे एका इंटरकॉलेज कॉम्पिटीशनमध्ये दारू पिऊन अभिनय केल्याचा संदर्भ लागला.  तेव्हा मास्तर दत्ताराम तिकडे परीक्षक होते व ते या प्रकारामुळे मध्येच स्पर्धा सोडून रागाने निघून गेले होते.  पण खरंतर डॉक्टरांचा अभिनय एवढा अप्रतिम होता की दारू न पिता ते हुबेहूब बेवड्याचा अभिनय करत होते.  संभाजी महाराजांच्या ऑडिशनला हे त्यांना पुन्हा आठवल्यावर त्यांनी रागाने डॉक्टरांना निघून जाण्यास सांगितले.  पण संधी हातातून जातेय पाहील्यावर डॉक्टरांनी पुन्हा बेवड्याची भूमिका त्याक्षणी परिस्थिती स्वतःविरुद्ध असतानासुद्धा चपखळ बजावली व संभाजी महाराजांची भूमिका घेऊनच बाहेर पडले.

३. स्वप्न साकार करण्यासाठी जीव ओतून काम करा.
संभाजी महाराजांचा रोल मिळाल्यानंतर तो निभावण्यासाठी डॉक्टरांना खूप मेहनत घ्यावी लागली.  त्यांची रात्रीची झोप उडाली.  दिवसरात्र ते संभाजी महाराजांसारखेच वागण्याचा प्रयत्न करीत. ते संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व जगण्याचा प्रयत्न करत होते. या नाटकातलं त्यांचं संभाजीचं पात्र सुपरहिट झालं.

४. तत्वांशी एकनिष्ठ राहा.
"रायगडाला जेव्हा जाग येते" हे नाटक त्यावेळी हाऊसफुल चालू होतं.  इतकं डिमांड असताना निर्मात्याला खाजगी प्रयोगाची ऑफर आली ज्यात काही ठराविक लोकांसमोर नाटक सादर करायचं होतं.  संभाजी महाराज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावेत ही भावना ठेवून नाटक लिहिलेलं असताना फक्त पैशांसाठी खाजगी प्रयोग करावेत ही भावना डॉक्टरांना संभाजी महाराजांच्या प्रतिमेसाठी अपमानास्पद वाटली.  इतक्या तुफान चाललेल्या त्यांच्या या भूमिकेवर त्यांनी या एकाच कारणासाठी पाणी सोडलं आणि वसंत कानेटकरांशी वैमनस्य पत्कारलं.

५.  मतभेद विषयनिष्ठ असावेत, व्यक्तिनिष्ठ नव्हे.
"रायगडाला जेव्हा जाग येते" नाटक सोडल्यावर डॉक्टरांना पुढे नाटकात लगेच रोल मिळत नव्हते.  त्यांना जेव्हा प्रभाकर पणशीकरांकडून नव्या नाटकासाठी विचारणा झाली तेव्हा नेमकं ते नाटक वसंत कानेटकरांनीच लिहिलेलं होतं.  डॉक्टरांबरोबर काम करण्याची कानेटकरांची अजिबात ईच्छा नव्हती म्हणून त्यांनी सुरुवातीच्या डिस्कशनमध्ये डॉक्टरांना अपमानास्पद वागणूक दिली.  पण पुढे दोघांचं संगनमत झाल्यावर डॉक्टर स्वतः रोल कसा वटला पाहिजे यासंबंधी कानेटकरांकडे विचारपूस करीत.  अगदी प्रयोगाच्या एंट्रीला दोघांनी ठरवून "अश्रूंची झाली फुले" या नाटकातील "लाल्या" नावाचं अजरामर कॅरॅक्टर ऐनवेळी पेहराव आणि स्टाईलमध्ये बदललं आणि पुढे त्याच भूमिकेने इतिहास रचला.

६. यश पचवता आलं पाहिजे.  त्याची नशा होता कामा नये.
नाट्यक्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टींचा इतिहास डॉक्टरांनी रचला.  जसं की एंट्रीला टाळ्या, डायलॉगचा पब्लिक रिस्पॉन्स, डायलॉगसाठी शिट्या आणि स्वतःच नाव शेवटी लावणे.  त्यांना प्रत्येकवेळी प्रेक्षकांनी उचलुन धरलं.  पण त्यांना या सगळ्या गोष्टींची इतकी सवय लागली की जेव्हा प्रेक्षक प्रतिसाद देत नव्हते तेव्हा ते बंडखोर होत गेले.  कुणालाच जुमानत नव्हते.  रंगभूमीचे अलिखित नियम त्यांनी बऱ्याचवेळा तोडले.  खूपवेळा दारू पिऊन ते रंगमंचावर आले ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात त्यांची प्रतिमा खालावत गेली.

७.  आयुष्यात एकतरी मेंटर असणे गरजेचं आहे.
डॉक्टरांचं आणि त्यांच्या अर्ध्या वयाची असणाऱ्या सुलोचना दीदी यांची मुलगी कांचन हीच प्रेम प्रकरण होतं.  लग्न झालेल्या व्यक्तीसाठी हे चुकीचं असलं तरी कांचन ही त्यांच्या आयुष्यातली मेंटर होती.  रंगभूमीच त्यांच्यासाठी कशी योग्य किंवा त्यांचं नाव नाटकात शेवटी लावण्याची प्रथा कांचनमुळे शक्य झाली.

८.  आयुष्य बदलण्याची संधी नकळतपणे बऱ्याचवेळा येते, तेव्हाच बदलता आलं पाहिजे.
खूप चुकीच्या पद्धतीने वागूनसुद्धा रंगमंचावर कसब दाखवण्याची संधी डॉक्टरांना वारंवार मिळाली.  पण त्यांनी प्रत्येकवेळा ती संधी उधळून लावली.  सुरुवातीच्या काळात त्यांनी प्रत्येक संधी अचूक हेरली पण यश मिळाल्यानंतर त्यांना दुर्दैवाने पुढे दारूच्या नशेमुळे ते हेरता आलं नाही.

९.  आयुष्यातल्या खऱ्या मित्रांची किंमत ओळखा.
पणशीकर हे डॉक्टरांचे अत्यंत जवळचे मित्र.  त्यांनी प्रत्येकवेळी डॉक्टरांची चूक पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्यासाठी कायम निरनिराळ्या संधी उपलब्ध करून दिल्या.  जेव्हा समस्त नाट्यमंडळाने डॉक्टरांवर बहिष्कार टाकण्याचा विचार केला तेव्हासुद्धा तो प्रयत्न पणशीकरांनी हाणून पाडला.  पण डॉक्टरांना त्या गोष्टीची कधी किंमत नव्हतीच.  काहीवेळा त्यांनी पणशीकरांचा अपमानसुद्धा केला पण पणशीकरांनी ते कधी मनावर घेतलं नाही.  ते शेवटपर्यंत डॉक्टरांना मदत करीतच राहिले.

१०. स्वाभिमान असू दे, "गर्व नको"
डॉक्टरांनी बरेच प्रयोग हाऊसफुल केल्यानंतर लोक त्यांना भेटण्यासाठी तुफान गर्दी करू लागले.  त्यांची स्टाईल कॉपी करू लागले.  पण मीच या रंगभूमीवर श्रेष्ठ आहे अशी भावना डॉक्टरांच्या मनात निर्माण झाली.  डॉ. श्रीराम लागू यांच्याशी अभिनय क्षेत्रातील डॉक्टरांशी  शीतयुद्ध चालू असताना, डॉक्टर नेहमी स्वतःला श्रेष्ठ मानत राहिले.  त्यात त्यांनी डॉ. लागू यांना कमी लेखण्यासाठी बरेच प्रयत्न केले.  पण त्यामुळे प्रत्येकवेळी त्यांचीच प्रतिमा खालावत गेली.  हळूहळू रंगभूमी डॉक्टरांसारख्या ऐतिहासिक नटाला मुकत गेली.  जेव्हा त्यांनी हे सर्व दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा वेळ निघून गेली होती.

खरंतर डॉक्टरांचं संपूर्ण आयुष्य वादळी होतं.  त्यांच्यात गोष्टी बदलण्याची धमक होती.  त्यांच्यातली धडाडी व आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता.  शेवटी उंची गाठण्यापेक्षा त्यावर टिकून रहाणं जास्त कठीण.  ती उंची जो टिकऊ शकला तोच जग जिंकू शकतो.

धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री

Comments

  1. छान तुलना केली आहे वास्तव जगाबरोबर

    ReplyDelete
  2. छान तुलना👌

    ReplyDelete
  3. Khup mast lihiles subodh..sagalejan fakt entertainment sathi cinema pahTat tu tyatahi learning shodhales hats off to u

    ReplyDelete
  4. खूप छान सर खूपच प्रेरणादायी आहे लेख

    ReplyDelete
  5. एकदम छान पद्धतीने लिहिलं आहे, खरं तर मी ह्या चित्रपटातला एक संवाद शोधत (क्रमांक १ शेवटी) होतो त्यावेळी आपली पोस्ट वाचायला मिळाली.

    मनःपूर्वक आभार💐💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

ऑफर?? नको रे बाबा!!!

ऑफर?? नको रे बाबा!!! - सुबोध अनंत मेस्त्री ================================== ================================== नमस्कार, गेले बरेच दिवस व्हाट्सअप्प वर एक मेसेज फिरतोय, अमेझॉनची ऑफर चालू आहे *सॅमसंग गॅलॅक्सी नोट 5* मोबाईल फक्त *999* रुपयात. गेल्या काही दिवसात रोज एका तरी ग्रुप वर किंवा पर्सनली असा मेसेज मला येतोच आहे. कधी तो मोबाईल ऑफरचा असतो किंवा टीव्ही ऑफरचा मेसेज असतो. पण बऱ्याच अंशी मेसेजचा फॉरमॅट सेमच असतो आणि याला बरेच जण सारखे बळी पडतात म्हणून हे आर्टिकल लिहिण्याचा विचार मला पोलीस इन्स्पेक्टर संजय गोविलकर दादा यांनी बोलून दाखवला आणि म्हणूनच हा लेख तुमच्यासाठी. ================================== ================================== = "Incoming Call Dada" असा मोबाईल स्क्रीन वर डिस्प्ले दाखवत आणि वादळवाट ची रिंगटोन वाजवत माझं लक्ष माझ्या मोबाईलने खेचून घेतलं. दादा म्हणजे इन्स्पेक्टर संजय गोविलकर. फोन उचलल्या उचलल्या मला दादांनी पहिला प्रश्न केला, "सुबु, अमेझॉन ऑफरचा मेसेज बरेच दिवस मला सारखा येतोय. ते खरं आहे का?? मी आतापर्यंत दुर्लक्ष ...

पत्त्यांचं घर

"पप्पा, पत्त्यांच घर बनवता येत?", सार्थकने महिन्याभरापूर्वी विचारलेला प्रश्न.  मे महिना संपत आला होता.  शाळेला सुट्टी आणि बिल्डिंगमधल्या मुलांशी कट्टी म्हणून अख्खा दिवस घरी.  अशा वेळी करायच काय हा प्रश्न त्याच्यासमोर नेहमीचाच.  बॉल ने खेळायला लागला तर घरातलं काहीतरी फोडेल याची भीती म्हणून ते ही आई बाबा घरात खेळून देत नव्हते.  कार फिरवायचा त्यालाच कंटाळा.  मग अशा वेळी सोपा उपाय म्हणून पत्त्यांच घर हा पर्याय बाबांनी सुचवला. "हो येत ना", अस सांगून एक छोट सॅम्पल त्याला बनवून दाखवलं.  तो खुश झाला. मध्ये एकदा चार माळ्याचं घर त्याने बनवलं होतं आणि त्याने आनंदात मला ते दाखवलं.  विशेष म्हणजे पत्त्यांच्या घराला भिंतीचा सपोर्ट नव्हता.  मला दाखवताना तो खूप एक्ससाईटेड होता.  मी त्याला शाबासकी दिली. "अरे भिंतीचा सपोर्ट घेऊन बांधलस तर अजून मोठं होईल", त्याला सांगितलं. "आता किती माळ्याचं बांधू?", त्याने आत्मविश्वासाने प्रश्न विचारला. "सात माळ्याचं", मी टारगेट दिलं. "पप्पा? सात माळे? पॉसीबल आहे का?", तो त्याच्या नेहमीच्या स्...

दहा रुपये

“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना.  तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही.  चौथीतला आहे.  ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी.  आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते?  बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं.  पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते.  कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला.  कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला.  मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा.  खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा.  ...