Skip to main content

माणुसकीचा "चालक"



मोमो खाऊन आम्ही तिघे बाहेर पडलो आणि समोरच चौकात रिक्षा उभ्या होत्या.  काळोख पडला होता.  थोडावेळ पुन्हा एकदा आज झालेली डी. सी. पी. साहेबांसोबतची मीटिंग आणि पुढे होणाऱ्या कामांची उजळणी झाली.  तशी ती आज खूप वेळा झाली होती.  अतिष दादाने मला आणि दादाला रिक्षा बघून दिली आणि तो त्याच्या बाईकच्या दिशेने निघाला.  वायले नगर ते कल्याण स्टेशनपर्यंत रिक्षा शेअरिंगवर मिळाली.

माझ्या आणि दादाच्या बरच वेळ गप्पा सुरू होत्या.  अंतरही खूप होत आणि ट्रॅफिकही. इतक्यात माझं लक्ष ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर गेलं.  "जेष्ठ नागरिक व वयस्कर यांना ५०% सवलत.  कल्याण हद्दीत दवाखाण्यासाठी मोफत सेवा."  हे वाचून मला कौतुक वाटलं.  मी दादाला ती स्टेटमेंट दाखवली.  रस्त्यावरच्या दिव्याच्या प्रकाशात ती स्पष्ट वाचता येत होती. 

"चांगलं काम करताय तुम्ही.  मस्त वाटलं बघून", दादा कुणाचही कौतुक अगदी लगेच करतोच.

"काय साहेब?", रिक्षावाल्याने त्याच्या डाव्या बाजूच्या मोठ्या आरशातुन दादाला विचारलं.

"हे वाचलं मागे.", दादानेही सीटकडे बोट दाखवत आरशातच बघून सांगितलं.

"थँक यु", तो गालात हसला.

"तुमची स्वतःची रिक्षा आहे?", मी उजव्या बाजूच्या माझ्या समोरच्या आरशात पाहून विचारलं.

"होय साहेब, आता एकोनीस तारखेला बरोबर एक वर्ष होईल.  मागच्या लक्ष्मीपूजनला घेतली होती.  आधी १४-१५ वर्ष भाड्याने चालवली पण नंतर जिद्द लावून स्वतःची घेतली", तो दर अर्ध्या मिनिटाला बोलताना बाहेर वाकून थुंकत होता.  मला ते खटकत होतं. 

"ही ऑफर मी जेव्हा देतो ना साहेब, तेव्हा कधी लेडीज शक करतात माझ्यावर.  त्यांना वाटत इम्प्रेशन मारायला करतो.  पण कोण समजावून सांगनार? धंदा मी ऊसुलने करतो साहेब.  मी जेव्हा ही गाडी घेतली ना तेव्हा एक पैसा नव्हता माझ्याकडे.  पण जाम वाटायचं की असली पाहिजे.  माझ्या घरात एक स्वामींची छोटी मूर्ती आहे त्याकडे एकदा बोललो रात्री, 'स्वामी कायपन करा पण स्वतःची गाडी पाहिजे'.  गाडी लोनवर घ्यायची तरी सगळी लफडी निपटून 80 हजार ते 1 लाख पाहिजे.  आनायचे कुटून?  खिशात फक्त शंभर रुपये आणि स्वप्न मोट",  माझं लक्ष रिक्षाच्या पुढच्या काचेवर गेलं तर त्यावर स्वामींचा बैठक मुद्रेत फोटो होता.   "खर सांगतो साहेब, मी हे बोललो आनी दोन दिवसांनी माझा शाळेतला मित्र मला वीस वर्षांनी भेटला.  मग इकडच तिकडच बोलल्यावर मी भाड्याची रिक्षा चालवतो समजलं तर बोलला स्वतःची घे.  मी पैसे देतो.  पन तू परत देशील याची गॅरंटी काय?",  बोलताना तो भारावला होता.  पण तोंड चालू असताना आणि सारखा आरशातुन आमच्याकडे बघत असताना रिक्षावरचा कंट्रोल ट्रॅफिकमध्येही अगदी व्यवस्थित.

"मला आधी मजाक वाटला.  पण नंतर सिरीयस आहे बोलल्यावर मी स्टॅम्प पेपर आनला आणि त्यावर त्याला लिहून दिलं की मी यांच्याकडून ऐंशी हजार घेतले आणि दुप्पटपेक्षा पण जास्त देईल.  एक लाख ऐंशी हजार देईन त्याला चार वर्षात.  फिक्स हफ्ता नाय जमत पण होतात तसे टाकतो त्याच्या अकाउंटला.", मला हा सौदा तसा फायद्याचा नाही वाटला पण तरीही त्याची ईच्छा त्यावेळी त्याच्यासाठी मोठी होती.  "स्वामींनी दिली साहेब रिक्षा मला.  नायतर तो मित्र एवढ्या वर्षांनी कसा आला असता आणि पैसे कसे दिले असते?", मग त्याने १९ नंबर त्याच्यासाठी कसा लकी आहे ते आम्हाला समजावून सांगितलं.  पूर्ण संभाषण वन वे चाललं होतं. 

"मग या तुमच्या स्कीमचा फायदा घेतात का लोक?", मी उत्सुकतेने  विचारलं.

"घेतात ना साहेब.  मीच देतो.  माणूस बघितल्यावर समजतो.  शेअरिंगमध्ये असेल आणि एखाद्या म्हाताऱ्या व्यक्तीकडून कमी पैसे घेतले की ते कन्फ्युज होतात.  पण बाकी पॅसेंजर असल्यामुळे समजवायला वेळ नसतो.  मग नेक्स्ट टाइम भेटल्यावर सांगतो", तो हसत होता.  नंतर ज्या पोरांना प्रपंच चालवता येत नाही आणि आई बापाला बाजूला टाकतात ती कशी नालायक असतात ते त्याने सविस्तर एक्सपलेन केलं.

"माझे पप्पा सिक्सटी फाय एज.  पण अजूनही कामाला जातात आणि मला सपोर्ट करतात.  सगळी म्हातारी मानस पैसे कुठून आणणार साहेब? एखादा म्हातारा माणूस वाचमेनची नोकरी करताना झोपतो तेव्हा तो तिथल्या लोकांच्या शिव्या खातो.  तो थोडीना त्याच्या मर्जीने काम करतो.  तो पण आपल्या बापासारखाच.  अशा लोकांकडून पैसे नाही घेत साहेब आपण.", त्याच्या बोलण्याचं कौतुक वाटलं.  "बऱ्याच प्रेग्नंट बायका गाडीत बसतात तेव्हा मागचा मेसेज वाचून माझा नंबर घेतात.  काय काय बायकांचे नवरे नसतात किंवा नाईट ड्युटीला असतील तर इमर्जन्सी म्हणून.  मी देतो पन मी कुनाचा घेत नाही.  उगाच कुणाला वाटेल व्हाट्सअप्प वर चॅट करायला मागतोय.  आपल्याला तशी घानेरडी सवय नाही.  त्यांना देतो आनी त्यांना असेल काही इमर्जन्सी तर करतात फोन.  रात्री दोनला पेंशटने फोन केला तरी आपली टॉवेलवर रिक्षा काढायची पन तयारी असते.  एकदा एका ताईला नेलेला असाच.  नवरा कामावर आणि रात्री अर्जंट पोटात दुखायला लागलं.  डिलिव्हरीसाठी घेऊन गेलो सेफ एकदम.  सेकंड डे नवऱ्याने कॉल केला थँक यु बोलायला.  हजार रुपये पन देत होता.  नाही घेतले साहेब.  कुनाचा जीव वाचला तरी बस आपल्याला", आम्ही दोघेही फक्त ऐकत होतो.

"लोनचे हफ्ते जातात का बरोबर?", मी सहज विचारलं.  आता त्याच पर्सनल अस काही राहिलंच नव्हतं.

"कधी जातात साहेब.  आता ४ थकलेत.  बँकवाले धमक्या देतात.  मी गाडी नेऊन लावली एकदा बँकेत.  मॅनेजरला बोललो, 'साहेब, तुम्हाला डूबवायचा नाही पन सध्या भरायला पैसे नाही.  गाडी राहू दे बाहेर उभी वर्षभर.  परत भाड्याची चालवेन आनी तुमचे पैसे आनून देईन.  पन माझ्या लक्ष्मीला एक खरोच पन नाय आली पाहिजे. अस बोलून चावी ठेवली मॅनेजर समोर", तो अभिमानाने सांगत होता.

"मग?", आमची उत्सुकता

"काय नाय.  मॅनेजर बोलला जा बाबा चावी घेऊन.  थोडे तरी भर पैसे सध्या.  बाकी मी सांभाळतो.", त्याने हसून सांगितलं. "इकडून तिकडून थोडे करून नेऊन दिले.  आपल्याला कुनाला फसवायचय साहेब?  देव आपल्याला देनार बरोबर.  स्वामींनी रिक्षा दिलीय तेच बघतील.  मी फक्त काम करतो".  स्टेशन आलं होतं.  दादाने उतरून शेअरिंगचे पैसे काढले.  मला उगाच वाटून गेलं १०० त्याला द्यावेत म्हणून.  पण त्याचा स्वाभिमान दुखावला जाईल असंही वाटलं आणि मी स्वतःला आवरलं.  "नाव काय तुमचं?", मी विचारलं

"माझं? स्वप्नील सकपाळ", त्याने मागे वळून सांगितलं.

"एक फोटो घेऊ का तुमचा?", मी विचारलं.

"माझा कशाला साहेब.  अवतार नाही बरोबर", तो नकार देत असताना मी तो घेतलाच.  त्याला शुभेच्छा देऊन निघालो.  या १५-२० मिनिटाच्या प्रवासात बरंच काही शिकायला मिळालं.

"तुला आर्टिकलला नवा विषय मिळाला", दादा हसत म्हणाला.

"होय.", मी ही हसत उत्तर देत प्लेटफॉर्मच्या दिशेने वळलो.


धन्यवाद,
सुबोध अनंत मेस्त्री
9221250656

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

माणुसकीची भिंत

माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं.  काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात.  पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची.  एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही.  परखड आणि स्पष्ट बोलणारा.  तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही.  आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील.  पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच.  बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे.  खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात.  पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे.  उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं.  एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आपण अशी एक भिंत उभी करायची ज्यावर आपल्याला नको असले

"तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" 😮

" तुमची प्रत्येक गोष्ट ट्रॅक होतेय!" "If you are not paying for the product, then you are the product." नेटफलिक्सवर "सोशल डीलेमा" आणि "द ग्रेट हॅक" या दोन डॉक्युमेंटरी पहिल्या.  याच इंडस्ट्रीमध्ये बरीच वर्ष काम करत असल्याने सोशल मीडिया ॲप्सचे इंटर्नल वर्किंग बऱ्यापैकी माहीत होतंच पण यात ते अजून प्रखरपणे  हायलाईट झालं. "मुळात सगळ्याच गोष्टी फ्री मध्ये देणाऱ्या गूगल, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सॲप सारख्या कंपन्या इतक्या श्रीमंत कशा?" असा प्रश्न मी कायम माझ्या सेशन मध्ये विचारतो.  यात नॉन टेक्निकल म्हणून मला बरीच उत्तर समोरच्या प्रेक्षकांकडून मिळतात जसं की, "इंटरनेट कंपनी त्यांना वापराचे पैसे देत असेल किंवा ते आपला डेटा विकत असतील".  काही लोक "ॲडवर पैसे कमवत असतील" असंही सांगतात पण ते नक्की कसं हे सांगता येत नाही.  हेच नेमकं या दोन्ही डॉक्युमेंटरीज मध्ये कव्हर केलं आहे. "त्यांना तुमच्यात इंटरेस्ट नाही तर तुमच्या इंटरेस्टमध्ये इंटरेस्ट आहे".  ज्यावेळी अमेरिकेचं इलेक्शन झालं होतं त्यावेळ केंब्रिज ॲनालिटीका या डे

सायकल, संज्या आणि गटारी

"अरे कुठे होतास तू? घरी जा. आज तुझं काही खरं नाही.", बाहेर मार्केटच्या मोठ्या रस्त्यावरच मागच्या घरातला बाबूदादा भेटला. त्याच्या या प्रतिक्रियेने मला धडकी भरली. रस्त्यावरची वर्दळ कमी झाली होती म्हणजे आज बराच उशीर झाला होता. सायकल तशीच हाताने धरून चालवत मी चाळीबाहेरच्या रस्त्यावर पोहचलो. चाळीतली सगळी मुलं रस्त्यावरच उभी होती. सगळे माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघायला लागले. मी मानेनेच "काय?" म्हणून खुणावल. "अरे चाळीतले सगळे शोधतायत तुला. वाजले बघितलस का किती? साडे दहा होऊन गेले. तुझी काय खैर नाही आता", पक्याने सांगितलं. घाबरलेल्या माणसाला पूर्ण कसं मारायचं याचा स्पेशल कोर्स केला असेल चाळीतल्या पोरांनी. चाळीत पाऊल टाकल्याक्षणापासून "सुबोध आला रे" असे शब्द कानावर पडायला लागले आणि आता घरी माझी काय अवस्था होईल या भीतीने माझी घराकडे जाणारी पाऊलं अजून जड व्हायला लागली. त्यावेळी मी सातवीत होतो. काही दिवसांपूर्वीच नवी कोरी लाल रंगाची स्वेअर हँडलवाली सायकल पप्पानी आमच्यासाठी घेतली होती. सायकल आणायला तसे मी, दादा आणि पप्पाच गेलो होतो. मी