*ये उडी उडी उडी* - सुबोध अनंत मेस्त्री ================================================ "ए आयुष्यात कधी पतंग हातात तरी धरलेलीस का?" अजाने टोमणा मारलाच. "हा तू मोठा शहाणा ना. तुला येते का? मी उडवलीय लहानपणी", मी थोडा उखडलो होतो. "सुबोध भावोजी चिडले", म्हणत पूनम चिडवायला लागली पण माझ लक्ष सध्या कणी बांधण्यात आणि प्रसाद पासून फिरकी वाचवण्यात गुंतलं होत. आम्ही ५ जण पतंग उडवणारे आणि फिरक्या फक्त तीनच. त्यात दादा आणि सुनील दादा कणी बांधून पतंग उडवायला गेलेसुद्धा. माझी आणि प्रसादची फिरकीवरून एकमेकांची फिरकी घेणं चालू होत. अजा कधी प्रसाद ची बाजू घ्यायचा कधी माझी. मी फिरकी प्रतिभाकडे दिली आणि कणी बांधायला सुरुवात केली. खरं तर मी या आधी ना स्वतःहून कधी कणी बांधली होती ना पतंग उडवली होती. लहानपणी आमच्या चाळीतला कुणी मोठा दादा पतंग उडवायचा आणि मी फिरकी धरायला उभा राहायचो. मग एकदमच उंचावर पतंग जाऊन मूक(स्थिर) झाली कि माझ्या हातात फक्त मांजा धरायला द्यायचा. हाच काय तो अनुभव माझ्या गाठीशी. बीचवर हवा जास्त असल्याकारणाने पतं...