"मी बिजनेस चालू करायचा विचार करतोय. आम्ही पाचजण तयार झालोय. सगळे शाळेतलेच मित्र. तू ओळखतोस सगळ्यांना. शाळेपासून आतापर्यंत काही ना काही निमित्ताने एकत्र भेटतोच आम्ही पण आता या निमित्ताने आयुष्यातला बराच वेळ एकत्र काढता येईल. आम्ही रायगडावर गेलो होतो तिथेच ठरवल आम्ही. कंपनीच नाव पण ठरलंय. स्वराज्य.", मी एकदम उत्साहात दादाला सांगत होतो आणि तोही तितक्याच उत्साहात मला प्रतिसाद देत होता. "अरे वा! मस्तच नाव ठरवलंय तुम्ही. महाराजांचा आदर्श समोर असेल तर काही चुकीच घडणार नाही आपल्या हातून. बिनधास्त कर. पैशांची गरज लागणार आहे का तुला?". दादाने विचारल्यावर मी नकारार्थी मान डोलावली. नंतर माझे स्वप्न आणि प्लॅन दादाला सांगण्यात बराच वेळ गेला आणि तोही ते ऐकत होता. प्रतिसाद देत होता. मला त्यावेळी 3 वर्षाचा सॉफ्टवेअर इंडस्ट्री मधला अनुभव होता आणि कुणाच्या हाताखाली काम करण्याचा कंटाळा आल्याने स्वतःच स्वराज्य निर्माण करू अशी संकल्पना मी माझ्या मित्रांसमोर आमच्या रायगड ट्रिप मध्ये मांडली होती आणि माझ्या 4 मित्रांनी त्याला प्रतिसाद दिला. आयुष्यातली कोणतीही गोष्ट ठरवली की मी ती अग...