प्रिय काकी, आज तुझ्या सेवानिवृत्ती समारंभात येऊन छान वाटलं. दादाने आमच्यावतीने थोडक्यात पण उत्तमरित्या तुझ्या जीवनप्रवासाचं वर्णन केलं. बोलण्यासारखं माझ्याकडेही बरंच होतं पण तिथे बऱ्याच जणांना बोलायचं होतं आणि असंही जवळच्या व्यक्तींबद्दल बोलताना माझ्या भावना अनावर होतात म्हणून मी तिथे बोलणं टाळलं. त्यासाठीच हा पत्रप्रपंच. बालपणातला बराच काळ मी तुम्हा दोघांसोबत घालवला. तुमच्या लग्नाच्या वेळी मी तिसरी चौथीला असेन. त्या काळात मुलांचे बर्थडे सेलिब्रेट करण्याचं एवढं काही फॅड नव्हतं पण चाळीत दोन तीन सुखवस्तू घरातले बर्थडे बघून माझ्या बालमनात ती ईच्छा निर्माण झाली होती. मी आतापर्यंत कधीच वाढदिवस साजरा केला नाही हे तुला समजल्यावर तू आणि नयना मावशी मिळून घरी येऊन माझा वाढदिवस सेलिब्रेट केलात तो प्रसंग आजही माझ्या मनात ताजा आहे. आता कदाचित वाढदिवस साजरा करणं ही खूप कॉमन गोष्ट आहे पण तीसेक वर्षापूर्वी ती नक्कीच नव्हती. त्यानंतर तुझ्यासोबत पाहिलेला जुरासिक पार्क सिनेमासुद्धा एक वेगळा आणि धमाल अनुभव होता. तुम्हा दोघांच्या लग्नातला मी टोकणा. लग्नात बरेच फोटो काढायला मिळतील या अपेक्षेव...