काही वर्षांपूर्वी रणजित देसाईंच "राधेय" वाचलं होतं. महाभारतातल्या कर्णाची बाजू त्यात प्रकर्षाने मांडली होती. त्यावेळीच कुणीतरी शिवाजी सावंत यांचं "मृत्युंजय" वाच असं सुचवलं. आमच्या सुनयना गायकवाड ताईने राबवलेल्या पुस्तक प्रदर्शनात मी ते दोनेक वर्षांपूर्वी घेतलं आणि पुस्तकाची लहान अक्षरात छापलेली ७२७ पाने बघून ते "एवढं कधी वाचून व्हायचं?" म्हणून कायम पुढे जात राहिलं. पण दर दिवशी पाच असे २३९ धडे वाचायचे हा निर्धार करून गेल्या दीडेक महिन्यात पुस्तक पूर्ण वाचून काढलं. प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात. जे तुम्हाला दिसतं ते खरं असतंच असं नाही. असंच काहीसं या दोन्ही पुस्तकातून तुम्हाला कर्णाबद्दल वाचताना वाटतं. पांडवांची अयोग्य बाजू बऱ्याच ठिकाणी प्रकर्षाने दिसून येते. महाभारत म्हटलं कि सहसा पाच पांडव, श्रीकृष्ण, दुर्योधन, धृतराष्ट्र, गांधारी, भीष्म, द्रौपदी आणि शकुनी मामा हेच डोळ्यासमोर येतात. कर्णाची त्यातली महत्वाची भूमिका ही या दोन्ही पुस्तकांमुळे समोर येते. सूर्याच्या दिव्य शक्तीतून ...