“अरे नाय उलटणार साहेब...एकांद्या वेली कधी कधी पंदरा मानस घेऊन जातो मी...मदी मच्चीच्या टोकऱ्या पन असतात. तुम्ही खाली पाट घेऊन बसा", एकदम आत्मविश्वासाने त्याने बंधाऱ्यापासून पाण्याच्या दिशेला गेलेली होडी, हातातली काठी विरुद्ध बाजूला दाबून परत होडी बंदाऱ्याला टेकवली. "बसा बसा काय होत नाय. उधान येतंय दर्याला. सगल्यानी एकदम बसा नायतर अर्धे अर्धे चला.", त्याने काठी दाबतंच आम्हाला सांगितलं. "अर्धे अर्धेच जा. अर्धी माणसं अजून यायचीत", आबांनी शंभूला कडेवर सावरत आम्हाला सांगितलं. केळशीला जायची ही माझी चौथी वेळ. निसर्गाने मुक्तहस्ताने वरदान दिलेल्या या गावाची ओढ सुटत नाही. मावशी खाडीपलीकडच्या साखरी गावात असणाऱ्या एका आदिवासी पाड्यातील अंगणवाडीत शिक्षिका म्हणून काम करतात. आबासुद्धा त्याच शाळेत शिकवायला होते. पण तीन वर्षांपूर्वीच त्यांची रिटायरमेंट झाल्यामुळे मावशी आता एकट्याच शाळेत जातात. तिकडची शाळा कशी असेल हे बघण्याची उत्सुकता आम्हाला होतीच पण त्यापलीकडे सार्थक आणि अश्मीला गावातली मुलं कोणत्या परिस्थिती शिकतात...