माणसाने कोणत्या गोष्टीच्या प्रेमात पडावं किंवा कोणत्या गोष्टीचा ध्यास घ्यावा हे प्रत्येक व्यक्तींच्या मूळ स्वभावानुसार ठरत असतं. काही व्यक्ती स्वतःकडे खूप काही असून दुनियेसमोर फक्त आपल्या समस्या घेऊन उभ्या राहतात तर काहीजण स्वतःकडे जे आहे त्यातला काही भाग समाजाला कसा उपयोगी ठरेल यासाठी कायम प्रयत्न करतात. पुंडलिक दुसऱ्या प्रकारात मोडतो. माझी आणि पुंडलिकची ओळख तशी बऱ्याच वर्षांपूर्वीची. एका भेटीत सगळ्यांनाच रुचेल असा हा व्यक्ती नाही. परखड आणि स्पष्ट बोलणारा. तसं माझंही अगदी पहिल्या भेटीत जमलं नाही. आमची नाळ जुळण्यासाठी सहाएक महिने आरामशीर गेले असतील. पण जो बंध घट्ट झाला तो कायमचाच. बाहेर बाहेर कणखर दिसणारा हा व्यक्ती अत्यंत संवेदनशील व हळवा आहे. खरंतर माणूस हा समाजशील प्राणी पण सध्याच्या व्यक्ती सोशल मोडियासारख्या वर्चुअल समाजात वावरतात. पुंडलिक दोघांचं तारतम्य बरोबर राखून आहे. उलट त्याला खऱ्याखुऱ्या समाजात वावरणं जास्त आवडतं. एकदोन वर्षांपूर्वी पुंडलिकने "माणुसकीची भिंत" हा कन्सेप्ट माझ्यासमोर मांडला. आप...