नेहमीप्रमाणे रस्ता क्रॉस करून मी मैत्रीपार्क बस स्टँडच्या विरुद्ध बाजूला असणाऱ्या साईबाबा मंदिराच्या बाहेर पोहचलो. सहाचा क्लासमध्ये लेक्चर आहे तर आता परत जाताना घाई करावी लागेल या विचारात असतानाच समोर पाहिलं तर नेहमी मंदिराबाहेर रस्त्यावर दिसणाऱ्या हारवाल्या मावशी दिसल्या नाहीत. तिथे काही म्हातारे आजी आजोबा पण काही मिळेल या आशेने बसलेले असायचे ते पण दिसत नव्हते. डावीकडे मंदिरात जायला वळालो तर मंदिराच्या गेटवर कापड टाकलं होतं. त्यामुळे आतलं काही दिसत नव्हतं. गेटबाहेच्या दोन शिड्या तोडल्या होत्या. मागच्या बाजूने मंदीरात शिरण्याचा रस्ता मला माहीत होता. काहीतरी काम चालू असेल या विचाराने मी आत शिरलो. आत एक वयस्कर बाई मांडी घालून गाभाऱ्यात पाहत बसल्या होत्या. आत शिरल्यावर गाभारा पाहिला आणि अंगावर काटा आला. गाभाऱ्यात दिमाखात असणारी साईबाबांची ती उंच मूर्ती तिथे नव्हती. आजूबाजूच्या सगळ्याच मुर्त्या नव्हत्या. तिथे तोडफोड झालेली दिसत होती. मला काहीच कळेना. तरीही नमस्कार करून बाहेर पडलो आणि गेटजवळच उभा राहिलो....