प्रिय डॉ. साऊ, आज ही पदवी तुझ्या नावासमोर बघताना ऊर अभिमानाने भरून आलाय. कागदोपत्री तू जरी आज डॉक्टर झाली असलीस तरी आमच्यासाठी तू खूप वर्षांपासून डॉक्टरच आहेस. मी तुला केव्हापासून डॉक्टर साऊ म्हणतोय मला आठवत नाही. तेव्हा ते अनऑफिशिअल होतं. यापुढे मीच नाही तर अख्खी दुनिया तुला डॉक्टर सायली या नावाने ओळखेल आणि तेसुद्धा ऑफीशिअली. आज आपल्या पूर्ण घराचं इतक्या वर्षांपासून असलेलं एक मोठं स्वप्न पूर्ण झाल्याचं मी सगळ्यांच्या डोळ्यात पाहिलं. अगदी स्वतःच्या सुद्धा! आज जेव्हा संध्याकाळी मिटिंगला असताना अप्पांचा दादाला फोन आला तेव्हा ही गुड न्यूज ऐकून आम्हा दोघांचेही डोळे पाणावले होते. मिटिंग अर्धवट सोडून आमचं लक्ष फोनवरच होतं. समोर बसलेल्या क्लायंटना सुद्धा आम्ही अभिमानाने सांगितलं की आमची बहीण एम.बी.बी.एस झाली. मिटिंग संपल्यावर थकलेलो असतानासुद्धा आमची पावलं घराकडे न वळता जुईनगरला वळली. त्यात तुझ्याबद्दलच प्रेम होतं आणि महत्वाचं म्हणजे तुझ्याबाबतीतला अभिमान होता. तुला आणि अप्पा काकीला कधी बघतोय अस झालं होतं. कदाचित जुईनगरल...