*शिवी* - सुबोध अनंत मेस्त्री ======================================================================== "सुबू, जरा सार्थककडे लक्ष दे. काल घरात शिवी दिली त्याने. म्हणजे सहज बोलता बोलता बोलला", प्रतिभा आणि मी ट्रेन मधून घरी येत होतो. दरवाजाच्या बाजूला असणाऱ्या पॅसेज मध्ये ती जाळीबाजूच्या पार्टिशनला टेकून उभी होती आणि मी तिच्या समोर. ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. "काय दिली शिवी?", मी प्रतिभाचा चेहरा बघून मुद्दाम विचारलं. तिला शिव्या पहिल्यापासूनच आवडत नाहीत. "अरे ती बहिणीवरून देतात ना ती. मला अगोदर समजलं नाही. मी पुन्हा अण्णांना ऐकायला सांगितलं. तर शिवीच होती ती", ती त्रासिकपणे सांगत होती. "बरं मग", मी विचारलं. "बर काय? तू समजाव त्याला. मी विचारलं कुठून शिकला तर सांगत होता की बाहेरून एक मुलगा येतो सोसायटीमध्ये. तो शिव्या देतो. तू घरी असशील तेव्हा बघ कोण आहे तो मुलगा आणि समज दे त्याला. बिल्डिंगमध्ये येऊ नको सांग", जशी एका आईची चीडचीड व्हावी तशी स्वाभाविकच तिची होत होती. "त्याने काय होईल. सार्थक पुन्हा शिवी ना...