आज ट्रेन मधून बेलापूरपासून चेंबूर पर्यंत प्रवास करत होतो. दर गुरुवारी मंदिरात जाण्याची सवय खूप पूर्वीपासूनच आहे आणि तेही चेंबूरचच साईबाबा मंदिर. तसा मी नेहमी संध्याकाळीच जातो पण रक्षाबंधन असल्याने संध्याकाळी जायला जमणार नाही म्हणून दुपारीच निघालो. दुपारची वेळ आणि त्यात काही लोकांची सुट्टी त्यामुळे ट्रेनला एवढी गर्दी नव्हती. पण काही लग्न झालेल्या आणि काही कुमारी अशा बहिणी नटून आपल्या भावाकडे निघाल्या होत्या आणि त्यांचं कुटुंब सोबत असल्याने काय ती थोडी फार रोजपेक्षा जास्त गर्दी. दरवाज्याच्या बाजूला सीटला समांतर असणाऱ्या जाळीच्या बोर्डला टेकून मी उभा राहिलो होतो आणि आठ दहा माणसे त्या पॅसेज मध्ये उभी होती. सीवुड स्टेशन ला ट्रेन थांबली आणि एक 12-13 वर्षाची मुलगी व तिच्याबरोबर दीड दोन वर्षाची लहान मुलगी ट्रेनमध्ये चढले. मोठी मुलगी काटकुळी...सावळी... केस सोडलेले आणि विस्कटलेले...चेहरा पूर्ण मळकटलेला...मळकट पंजाबी जांभळ्या रंगाचा ड्रेस तोही काळ्या रंगाच्या जवळपास गेलेला. एकंदरीत तिचा अवतार बघून एखाद्याला दया यावी, त्यापेक्षा ही अधिक कीळसच यावी आणि तिने आपल्याला हात लावून आपले...