आप्पा! कोणत्याही मराठी कुटुंबामध्ये आदराने वापरला जाणारा शब्द. काही लोक बाबांना आप्पा म्हणतात, काही आजोबांना काही काकांना. आमच्या कुटुंबात असणाऱ्या आप्पानी या सगळ्याच भूमिका बखुबी निभावल्यात. काही माणसे या पृथ्वीतलावर जन्म घेतात आणि जन्म आणि मृत्युमधला प्रवास एक औपचारिकता म्हणून करतात, पाट्या टाकत आयुष्य जगतात. तर काही माणसे आपण ज्या साठी जन्म घेतला त्या हेतूचा शोध घेतात, तो पूर्ण होईल यावर दृढ निष्ठा ठेवतात, स्वतःला लायक बनवतात, हेतू साध्य करण्यासाठी जिवाचं रान करतात आणि एकाच आयुष्यात असं काही घडवतात जे येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतं आमचे आप्पा त्यापैकीच एक! आप्पांचा जन्म १२ डिसेम्बर १९६२ रोजी डिंगणीत झाला. घराची परिस्थिती बेताची होती. आमच्या आजोबांचं हातावर पोट आणि घरात खाणारे १३ जण. चिकन-मटण फक्त वर्षातून एक दोन वेळाच सणावारीच असायचं. कधी भाकरी नाही म्हणून फक्त भाजीवरच पोट भरायचं तर कधी कोंद्याची भाकरी करून दिवस काढायचे. ती पण प्रत्येकाच्या वाट्याला एक चौथ भर आली तरी भाग्यच. अशी बिकट परिस्थिती. पण आम...