आईच्या घटनेनंतर काही दिवस पुस्तक वाचता आलं नाही आणि जेव्हा पुस्तक वाचण्याचा विचार केला तेव्हा नेमक्या "श्यामची आई" याच पुस्तकावर कपाटात पहिल्यांदा लक्ष गेलं. पुस्तक चांगलं आहे याबाबतीत शंका नव्हती पण इतकी वर्ष कपाटात असून पुस्तकांच्या गर्दीत नजरेत आलं नाही. जी गोष्ट सतत विचारात तीच नजरेसमोर पटकन येते असंच काहीस झालं. आईच्या आठवणीत असतानाच हे पुस्तक समोर आलं आणि पूर्ण वाचून काढलं. सानेगुरुजींचे बाबा गावात खोत होते त्यामुळे घरात प्रचंड श्रीमंती. भावाभावांमधल्या प्रॉपर्टीमधल्या वादातून त्यांना घर सोडावं लागलं आणि बिकट आर्थिक परिस्थितीचा सामना सानेगुरुजींच्या आई बाबांना करावा लागला. आयुष्यातली काही वर्ष वैभवात घालवून पुन्हा अगदी शून्यावर येणं म्हणजे कसोटीच होती. अपमानाच्या कित्येक प्रसंगातून पूर्ण कुटुंबाला जावं लागलं. पोटची दोन मुले त्यांना आयुष्याच्या प्रवासात गमवावी लागली. कित्येक अडचणी समोर आल्या पण त्यांनी आपली तत्वे सोडली नाहीत. मुलांवर संस्कार करताना त्यांनी कोणतीच तडजोड केली नाही. पुस्तकातल्या प्रत्येक गोष्टींमध्ये मी स्वतःच्या आयुष्यातल्या घटना शोधत होत...