“पप्पा, तुम्ही एकदा शाळेत या ना. तो एक मुलगा माझ्याकडे दहा रुपये मागतो रोज.", सार्थक शाळेत निघताना हेल काढून त्याच्या स्टाईलमध्ये अर्धा रडत आणि अर्धा बोलत मला सांगत होता. "कोण? तुझ्या वर्गातला आहे का ?", मी त्याला जवळ घेऊन विचारलं. "नाही. चौथीतला आहे. ती दोन मुलं येऊन माझ्याकडे दहा रुपये मागतात सारखी. आणि नाही दिले तर मारेन म्हणतात", त्याचा तोच सूर होता. "तू घेतलेस का त्यांच्याकडून?", मी विचारलं "नाही" "मग का मागतायत ते? बाईंना नाव सांगितलंस?", मी विचारलं. "बाईंना सांगितलं. पण बाई म्हणतात तुमच्या आपापसातल्या कंप्लेंट माझ्याकडे आणायच्या नाहीत.", त्याचा सूर काही बदलत नव्हता. "जल्ल मेल्याचं तोंड ते. कशाला बारक्या पोराला त्रास देतात? परवा पण सांगत होता तो मला. कोण ती पोर बघ जरा जाऊन एकदा", आईमधला वकील जागा झाला. मी लक्ष दिलं नाही. "तू खरंच नाही घेतले पैसे?", मी विचारल. "नाही पप्पा. खरंच नाही", त्याने रेटून सांगितलं. "बाई ऐकत नसतील तर प्रिन्सिपल बाईंकडे जा. ...