व्यक्तीला त्याच्या आयुष्याचा हेतू एकदा सापडला कि तो पूर्णत्वास नेण्यासाठी ती व्यक्ती काय करू शकते याच उदाहरण म्हणजे "कै. बाबा आमटे". श्रीमंतीत वाढलेल्या आणि नंतर वकीली पेशात असणाऱ्या बाबांना एका पावसाळ्यात गटारात पडलेला कृष्ठरोगी दिसला ज्याच्या जखमांमधून अळ्या बाहेर येत होत्या. पूर्ण शरीर उध्वस्त झालेल्या त्या व्यक्तीला पाहून आपण वकीली सोडून कृष्ठरोग्यांसाठी काहीतरी करावं हे त्यांनी निश्चित केलं आणि एका ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात झाली. 1949 मध्ये समाजाने नाकारलेल्या काही क्रुष्ठरोग्यांना एकत्र घेऊन वरोऱ्यात सरकारकडून मिळालेल्या एका जंगलातून त्यांनी आनंदवनाला सुरुवात केली. याच असहाय्य रोग्यांच्या मदतीने तिथे एक मोठं गाव उभं राहिलं. स्वतःला लागणाऱ्या गोष्टी स्वतः निर्माण केल्या जाव्यात म्हणून शेती, डेअरी, निरनिराळे उद्योग असं भलं मोठं साम्राज्य उभं राहिलं. कृष्ठरोग्यांबरोबरच अंध, अपंग आणि समाजाने दुर्लक्षिलेले असे कित्येक लोक आनंदवनाचा आसरा घेऊ लागले. विदर्भ असल्याने पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तळी खोदली गेली, विहिरी खोदल्या गेल्या. कोणत्य...