संध्याकाळी माझ्या एका कामानिमित्त बेलापूर स्टेशनजवळ गेलो होतो इतक्यात एका अनोळखी नंबरवरून फोन वाजला. संध्याकाळी ७ किंवा ७.३० ची वेळ असेल. आजूबाजूला बराच गोंधळ असल्याने मला नीट ऐकू येत नव्हतं. मी थोड्या वेळात कॉल करतो सांगून व समोरून "ठीक आहे" असं पुसटस ऐकू आल्यावर फोन कट केला. नेमका फोन कुठून आलाय हे मला कळालं नव्हतं. माझं काम झाल्यावर मी परतीच्या वाटेवर असताना पुन्हा त्याच नंबर वर कॉल लावला. "नमस्कार, थोड्या वेळापूर्वी आपला कॉल आला होता. सॉरी तुमचा आवाज आला नाही म्हणून कट करावा लागला", मी फोन लागल्याबरोबर सांगण्यास सुरुवात केली. "नाही काहीच हरकत नाही. मी निखिलेश चित्रे बोलतोय. दूरदर्शनमधून", समोरून आवाज आला. आता आवाज बऱ्यापैकी क्लीअर होता. "नमस्कार निखिलेशजी बोला", मी त्यांच्या बोलण्यास दुजोरा दिला "मी तुमचा ब्लॉग वाचला. आम्हाला टेक्नॉलॉजी व सोशल मीडियासंदर्भात न्यूजमध्ये बोलण्यासाठी एका तज्ज्ञाची आवश्यकता होती. तुम्ही तुमच्या ब्लॉगमध्ये जे काही मांडलय ते तुम्ही न्यूज मध्ये सांगू शकाल का?", ...