आठवणीतला "गारवा" - सुबोध अनंत मेस्त्री आमच्या घरातला दीड दिवसाचा गणपती निघायला तसा अजून तासभर वेळ बाकी होता. घराच्या मोठ्या खिडकीला लागून प्लास्टिकच्या आराम खुर्चीवर मी बाहेरचा पाऊस पाहत रेलून बसलो होतो. रात्रीच बऱ्याच वेळेचं जागरण असल्याने सगळे बेडरूममध्ये आराम करत होते. आमच्या करंजाडेच्या घराच्या खिडकीसमोरूनच डोंगर सुरू होतो. बिल्डिंग आणि डोंगरामध्ये फक्त एक छोटा रस्ता. डोंगर सुरू होतानाच पायथ्याशी एक झोपडी. कदाचित बाजूला बिल्डिंगच काम चालू असणाऱ्या कामगाराची असेल. गावाच्या घराला शोभेल अस विटांच घर. घरासमोर बांधलेल्या बकऱ्या पावसात भिजत होत्या. घराच्या मागे चढणीवर झुडपं साफ करून त्यांनी काही भाज्यांची लागवड केली आहे. तिथून थोडं चढण गेल्यावर एक खड्डा आहे ज्यातून उरणवरून माल वाहून नेणाऱ्या मालगाडीचा ट्रॅक जातो. पुढे पुन्हा थोडा डोंगर नंतर पनवेल पासून उरण ला जाणारा एक्सप्रेसवे आणि तो रस्ता क्रॉस केल्यावर खऱ्या डोंगराची सुरुवात. हे इतकं काही मध्ये आहे हे खिडकीतून जाणवतच नाही. अस वाटत की खिडकीसमोरच्...