*४९ रुपयांचं कर्ज* - सुबोध अनंत मेस्त्री ======================================================================== शाळा सोडून आता 16 वर्ष झाली. शाळेतल्या शिक्षकांनी खूप चांगल्या सवयी आमच्यामध्ये पेरण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या एक होत्या चौधरी बाई. माझ्या आईनंतर ज्यांनी मला आईसारखी माया लावली असेल त्या चौधरी बाई होत्या. अजूनही बाईंना भेटलो आणि वाकून नमस्कार केला की "खूप मोठा हो", असा आशीर्वाद मिळतो आणि काहीतरी करण्याची जिद्द. उद्या चौधरी बाई शाळेतून रिटायर्ड होत आहेत. त्यांच्या एका आठवणीचा हा लेख. ======================================================================== सातवीची नऊमाई परीक्षा होऊन गेली होती. गणिताची भीती मला असायचीच आणि त्यात नापासही झालो होतो. मला त्यावेळी क्लास लावण्याची भारी क्रेझ होती पण घरची परिस्थिती पप्पांच्या बेताच्या कामामुळे तशी चांगली नव्हती. "दादा अण्णा झाले पास क्लास न लावता. तुला कशाला पाहिजे क्लास. तू हुशार आहेस", अस बोलून आई नेहमीच माझी क्रेझ उतरवायची. मला आता वार्षिकच टेन्शन होत. पुढच्यावर्षी याच वर्गात राहा...