"पप्पा, मी दीदीकडेच राहणार आहे. परवा सुट्टी आहे मला", सार्थकने विचारलं नव्हतं तर मला डायरेक्ट सांगितलं होतं. "राहू दे त्याला. परवा इथे लहान मुलांची हंडी करायचा प्लॅन केला आहे. खाली बेसला एकच मुलगा आहे आणि बाकी तीन मुलीच आहेत. हा असेल तर बरं पडेल", दादाने दुजोरा दिल्यावर मी पण आढेवेढे घेतले नाहीत. ते असेही नसते घेतले कारण त्याला दिदीची आणि मोठे पप्पाची कम्पनी किती आवडते हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे. मी त्या चिमुरड्यांची दहीहंडी कशी असेल याची कल्पना करायला लागलो आणि त्याचबरोबर आमची दहीहंडी लहानपणी कशी होती त्या आठवणींवरची धूळसुद्धा आपसूकच उडायला लागली. चाळ म्हटलं की प्रत्येक सणवार जोरदारच व्हायचा. आमच्या चाळीत जवळपास आमच्याच वयाची बरीच मुलं आणि तेवढेच आमच्यावर हक्क गाजवणारी दादा वयाची मुलं त्यामुळे प्रत्येक गोष्ट बॅलन्स होऊन जायची. जेवढं घर लहान आणि माणसं जास्त तेवढाच त्यांचा एकमेकांशी संपर्क येण्याचं प्रमाण वाढतं आणि जेवढं घर मोठं आणि माणसं कमी तेवढाच त्यांचा आपापसातील संवाद कमी होऊन दुरावा वाढतो. ...